चेन्नई : भारतीय जनता पार्टीच्या तामिळनाडू प्रदेश शाखेचे सरचिटणीस व्ही. रमेश यांची काल अज्ञात मारेकर्यांनी त्यांच्या चेन्नईतल्या निवासस्थानाजवळ तीक्ष्ण शस्त्रांनी भोसकून हत्या केली. श्री. रमेश हे ५२ वर्षांचे होते आणि चेन्नई शहरामध्ये ऑडीटर रमेश म्हणून ओळखले जात होते.
व्ही. रमेश यांची हत्या कोणी केली आणि का केली याचा छडा अजून लागलेला नाही. पोलीस तपास जारी आहे. गेल्या वर्षभरात हत्या करण्यात आलेले श्री. व्ही. रमेश हे भाजपाचे पाचवे ज्येष्ठ नेते आहेत. गेल्या ऑक्टोबर महिन्यात भाजपाच्या प्रदेश शाखेच्या वैद्यकीय कक्षाचे चिटणीस डॉ. व्ही. अरविंद यांची वेल्लोर येथील त्यांच्या दवाखान्यासमोर अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती.
या व्यतिरिक्त अरुण रेड्डी, पी. मुरुगन आणि वेल्लीयन या तिघां भाजपा नेत्यांची हत्या गेल्या वर्षभरात झालेली आहे. यातल्या एकाही हत्येतील आरोपींना पकडण्यात आलेले नाही. राज्य सरकार भाजपाच्या नेत्यांच्या जीविताचे रक्षण करण्यास अयशस्वी ठरले असल्याचा आरोप पक्षाचे प्रदेश अध्यक्ष पोन राधाकृष्णन यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
दरम्यान व्ही. रमेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ येत्या सोमवार दि. २२ रोजी भारतीय जनता पार्टीने राज्यव्यापी बंदचे आवाहन केले आहे. शांतता भंग होण्याच्या शक्यतेमुळे राज्य सरकारने शनिवारीच शहरातल्या शाळांना सुट्टी जाहीर केली होती. बंद सोमवारी असला तरी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी निदर्शने केली असून काल पाच बसगाड्यांना आगी लावल्या आहेत.