भाजपाला हादरा बसेल ः कॉंग्रेसचा दावा

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल टाकावे आणि कॉंग्रेस पक्षाने त्याच्यावर केवळ प्रतिक्रिया नोंदवावी हा क्रम कालही जारी राहिला. भाजपाने आगामी निवडणुकीची तयारी म्हणून २० कमिट्या स्थापन केल्या. परंतु त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना कॉंग्रेसचे प्रवक्ते माहिती आणि नभोवाणी मंत्री मनिष तिवारी यांनी भाजपाच्या या तयारीची खिल्ली उडविली. भाजपाने अशा कितीही कमिट्या स्थापन केल्या तरी आणि टीम्स्ची नियुक्ती केली तरी भाजपाला हादरा बसणारच आहे असे श्री. तिवारी म्हणाले.

२००४ पासून २०१३ पर्यंत भारतीय जनता पार्टीने अनेक प्रकारच्या टीम्स् जाहीर केल्या. क्रिकेट, हॉकी, फुटबॉल या खेळाप्रमाणे भाजपाची राजकीय टीम वेळोवेळी जाहीर केली गेली. परंतु त्याचा काहीही फायदा झालेला नाही. आताही त्याचा काही फायदा होणार नाही. असे श्री. तिवारी यांनी प्रतिपादन केले.

दरम्यान भारतीय जनता पार्टीने पक्षाचे वरिष्ठ नेते एल.के. आडवाणी आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह १५ सदस्यांची केंद्रीय निवडणूक समिती स्थापन केली आणि २० समित्या निर्माण करून त्यांच्यावर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची नियुक्ती जाहीर केली. बर्‍याच चर्चेनंतर आणि बदल करीत या समित्या स्थापन झाल्या आहेत आणि भाजपाने निवडणुकीस तयार असल्याचे जाहीर केले आहे.

Leave a Comment