कांगारूना स्वस्तात गुंडाळले

लंडन – स्वॅनच्या फिरकी गोलदाजीमुळे लॉर्डस कसोटीत दुस-या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव १२८ धावातच आटोपला. ऑस्ट्रेलियन संघ २३३ धावांनी पिछाडीवर पडूनही इंग्लंडचा कर्णधार कूकने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन दिला नाही. दुस-या दिवसअखेरीस इंग्लंडने ३ बाज ३० धावा केल्या असून त्यांच्याकडे २६३ धावांची आघाडी आहे. सीडलने भेदक गोलदाजी करताना अवघ्या चार षटकांत तीन गडी बाद केले.

स्वॅनच्या फिरकीने कांगारूचा निम्मा संघ गारद केला. स्वॅनची फिरकी तसेच ब्रेसननचा मध्यमगती मा-यासमोर ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी उडाली. स्टुअर्ट ब्रॉडने कांगारूंचा कर्णधार मायकेल क्लार्कला (२८) पायचीत पकडले. ट्रेंट ब्रिज कसोटीत पदापर्णात ९८ धावांची विक्रमी खेळी करणारा अगरदेखील चहापानाआधी धावचीत झाला तो हकनाक धांदलीमुळे.

अँडरसनने बेल्स उडवून त्याला धावचीत केले . उपाहार ते चहापानदरम्यान २८ षटकात ऑस्ट्रेलियाने ६ फलंदाज गमावले ते ४१ धावात. वॉटसन , रॉजर्स यांनी १३ षटकात ४२ धावांची सलामी दिल्यावर उपाहाराआधीच्या अखेरच्या षटकात ब्रेसननने वॉटसनला पायचीत पकडले.
त्याआधी इंग्लंडने पहिल्या डावात ३६१ ची मजल मारली. तळाच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या ३३ धावांमुळे इंग्लंडने साडेतीनशेचा टप्पा ओलांडला . ब्रॉड , स्वॅन या तळाच्या जोडीने ४० चेंडूत ४८ धावांची भर घातली. पहिल्या दिवसअखेरीस लेगस्पिनर स्मिथने शतकवीर बेलसह , अर्धशतकवीर बेअरस्टो ,यष्टिरक्षक मॅट प्रायर बाद झाले होते.