वाहनेच आपसात साधणार संपर्क

वॉशिंग्टन दि.18- कारमधून एकापेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करत असतील तर त्या आपसात गप्पा मारतात. त्याच धर्तीवर आता वाहनेही एकमेकांशी संपर्क साधून बोलू लागली तर? कल्पना अशक्य वाटतेय? मग ऐका. संशोधकांनी वाहने परस्परात बोलू शकतील अशी इंटेलिजन्ट ट्रार्न्स्पोटेशन सिस्टिम विकसित केली असून त्यामुळे पुढे असणारी वाहने वाहतूक गर्दी, रस्त्यांची परिस्थिती म्हणजे रस्ते कसे आहेत, खराब की चांगले याची माहिती अन्य वाहनांना देऊ शकणार आहेत. वाहतूक कोंडी असेल तर तशीही सूचना मिळेल त्यामुळे अन्य वाहने गर्दीत अडकणार नाहीत.

व्ही टू व्ही सिग्नल देणारे हे तंत्रज्ञान नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केले असून या संशोधनाचे प्रमुख असलेले डॉ. डॅन स्टान्सिल सांगतात सध्या त्यात कांही थोड्या अडचणी येत आहेत मात्र हा प्रयोग नक्कीच यशस्वी होईल याची खात्री वाटते. एकदा का हे तंत्रज्ञान पूर्ण स्वरूपात वापरात आले की 100 मीटर अलिकडेच मागच्या वाहनांना पुढच्या परिस्थितीचा संदेश दिला जाईल आणि प्रवासातील वेळ त्यामुळे वाचू शकेल.

त्यासाठी कारमध्ये रेडिओ फि‘क्वेन्सीवर चालणारे ट्रान्समीटर वापरले गेले आहेत. मात्र वाहने ही चालणारी वस्तू असल्याने संदेश देणारे वाहन आणि तो घेणारे वाहन यात शक्यतो अडथळे असू नयेत. सध्या अडचण आहे ती अशी की रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे. पेट्रोल पंप, पार्किंग लॉट यामुळे हे सिग्नल त्या वस्तूंवर आदळून परत येतात व परिणामी सर्व दिशात संदेश सार‘या प्रमाणात पसरू शकत नाही. त्यासाठी हे सिग्नल थोडे अ‍ॅडजस्ट करावे लागणार आहेत. त्यात यश आले की ही यंत्रणा यशस्वीरित्या कार्यरत होईल असे त्यांचे म्हणणे आहे.
————-