या ‘श्रीमंत दामोदरपंत’चा फर्स्ट लूक रिलीज !

केदार शिंदे म्हटले की निखळ विनोद हे आलेच, मग ते नाटक असो किंवा चित्रपट. तसेच केदारच्या प्रत्येक निर्मितीबद्दलच विलक्षण उत्सुकता असते. केदार शिंदेचा आता या महिनाअखेरीच्या २६ तारखेला नवा मराठी चित्रपट येतोय आणि त्याचे नाव आहे श्रीमंत दामोदरपंत. कॉटसटाऊन पिक्चर्स प्रा.लि च्या सौरभ प्रधान निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाचा फर्स्ट लुक आज मुंबईतल्या एका छानशा रेस्तरौंमध्ये भरगच्च पत्रकार परिषदेत आणि सारया कलाकार व इतरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक जारी करण्यात आला. तुम्हाला नक्कीच आठवत असेल की श्रीमंत दामोदरपंत याच नावाचे नाटक काही वर्षांपूर्वी व्यावसायिक रंगभूमीवर आले होते आणि त्यावेळी ते गाजले होते तसेच त्यावेळी त्याला प्रचंड लोकप्रियताही लाभली होती.

श्रीमंत दामोदरपंत या मूळ नाटकात भरतने दामू ही मध्यवर्ती भूमिका केली होती. अर्थातच केदारचा चित्रपट म्हटला की सुपरस्टार भरत जाधवची भूमिका असायलाच हवी. या चित्रपटातही भरत जाधवच नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘श्रीमंत दामोदरपंत’ या चित्रपटाच्या निमित्ताने काही योगही जुलून आले आहेत. सुनील बर्वे हा अभिनेता आणि केदार शिंदे हा दिग्दर्शक असे दोघे या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र आले आहेत. कॉमेडीक्वीन निर्मिती सावंत हिचा मुलगा अभिनय सावंत या चित्रपटामधून रुपेरी पडद्यावर पदार्पण करतोय. छोटा पडदा गाजवताना लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस आणि दिग्दर्शक केदार शिंदे प्रथमच एकत्र आले आहेत.

सोनू निगमच्या आवाजातले आणि वैशाली सामंत हिने संगीत दिलेले एक गाणे यात आहे आणि ते त्याच्या खास स्टाईलमधले असल्याने नक्कीच लोकप्रिय ठरेल यात शंका नाही. ‘श्रीमंत दामोदरपंत’ या चित्रपटात भरत जाधव, सुनील बर्वे, विजय चव्हाण, अलका कुबल, पियुष रानडे, चैत्राली गुप्ते, मृणाल दुसानिस, अभिनय सावंत,वरद चव्हाण, जयराज नायर, दीपक आलेगावकर अशा कलाकारासमवेतच गायत्री गोडबोले, दुर्गेश नाबर, राजेश, उत्सवी, हिमानी असे बालकलाकारही आहेत.

Leave a Comment