सस्पेन्स कॉमेडीचा मिलाफ

एकतर्फी प्रेमाच्या गोष्टी आपण ऐकल्या होत्या. एकतर्फी प्रेमाला नकार मिळाल्यामुळे कशा प्रकारे नैराश्यातून आणि ती व्यक्ती आपली होऊ शकत नाही, या जाणिवेतून मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल द्वेष आणि ईर्ष्या निर्माण होते; त्यातच कशाप्रकारे कॉमेडी केली जाते, याचा मिलाफ म्हणजे फेकमफाक !आपल्या विनोदाने प्रेक्षकांना हसून लोटपोट करणारा आणि मराठीचा सुपरस्टार भरत जाधव आणि रुचिता जाधव यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. विजू खोटे आणि विजय चव्हाण यांनी आपल्या अभिनयाने विनोद निर्मिती करून प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे . फेकमफाक एक सर्वसामान्य घरातील कथा- एका चाळीत राहणारे कुटुंब गोपीनाथ देसाई ऊर्फ गोपी (भरत जाधव ), बाबा (विजू खोटे), आई ( सुलोचना ) आणि बहीण (हेमा) जिच्या भोवती ही कथा गोवली आहे.
स्नेहा आणि गोपी लहानपणापासून एकमेकांशी भांडत असतात. आणि दोघेही एकाच कंपनीमध्ये जेव्हा सेल्समनचे काम करतात तेव्हा त्यांना आलेल्या अनुभवातून ते विनोद निर्माण करून प्रेक्षकांना हसवून सोडतात.

धडपडे (मंगेश देसाई ) याचं गोपीची बहीण हेमावर एकतर्फी प्रेम आहे. त्याला हेमाने कोणत्याही मुलाशी बोलणे, त्यांच्यासोबत फिरणे आवडत नसते. त्याने एकदा हेमाला त्याच्या कॉलेजचा मित्रासह बाईकवर जाताना पाहिलेले असते; तेव्हाच तो गोपीला सावध करतो. पण गोपी त्याच्याकडे लक्ष देत नाही. दरम्यान कॉलेजमध्येही एका मुलाचे तिच्यावर एकतर्फी प्रेम आहे. हेमा मात्र त्याला नाकारते. दरम्यान हेमाचा खून होतो आणि विनोदी वळणाने जाणारी कथा सस्पेन्स बनते. प्राचार्यांच्या मुलीच्या लग्नानंतर हेमाचा ज्याप्रकारे, ज्या हॉटेलात खून होतो त्याच प्रकारचा खून आपण पाहिल्याची थाप तो स्नेहाला मारतो. पण त्याच्या बहिणीचा खूनही त्याच प्रकारे झालेला असतो. खून कोणी केला? या सस्पेन्समध्ये पोलिस चौकशी आणि त्यात कॉमेडी यांचा मेळ साधला आहे. एकतर्फी प्रेमी दोन असल्याने कथानकात प्रेक्षकांना अनेक धक्के बसतात.

बॉलिवुडमध्ये हृषीकेश मुखर्जी, बी. आर. चोप्रा यांना सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलेले दयानंद राजन यांचा मराठीतील हा पहिलाच प्रयत्न आहे. चित्रपटातील गाणी कथानकाला साजेशी आहेत. दीपाली सय्यदचे आयटम साँग प्रेक्षकांना भावणार आहे. कॉमेडी आणि सस्पेन्सचा धमाका असणारा फेकमफाक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी झाला आहे.

चित्रपट – फेकम फाक
निर्मिती – एसईएफएसी
दिग्दर्शक – दयानंद राजन
कलाकार – भरत जाधव, मंगेश देसाई, विजू खोटे, रुचिता जाधव.

रेटिंग – **

Leave a Comment