दुनियादारी १९ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस.

मैत्रीचा, प्रेमाचा नवा अर्थ उलगडून सांगणारी सदाबहार, टवटवीत प्रेमकथा घेऊन ‘झी टॉकीज’, एस्सेल व्हिजन आणि ‘व्हिडोयो पॅलेस’प्रस्तुत ड्रिमिंग ट्वेंटींफोर सेव्हन निर्मित एक ड्रिम प्रोजेक्ट असलेला आधीपासून जोरदार चर्चेत असलेला ‘दुनियादारी’ हा अत्यंत देखणा चित्रपट शुक्रवारी १९ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होतोय.

ऎंशीच्या दशकात तरूणाईच्या मनावर आपला खास ठसा उमटवणारी सुहास शिरवळकर लिखित ‘दुनियादारी’ ही कादंबरी आजही तरूणांना आपलीशी वाटते ती त्याच्या साध्या सरळ, वास्तवदर्शी मांडणीमुळे, तरूणांना वेड लावणारी ही ‘दुनियादारी’ त्याच दशकातील लुकसह, रेट्रो स्टाईलमध्ये रूपेरी पडद्यावर आणण्याचे धाडस प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक संजय जाधव यांनी दाखवले आहे.

स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, उर्मिला कानेटकर, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार, रिचा परियल्ली यांच्या यात महत्वाच्या भूमिका आहेत. तर इतर भूमिकांमध्ये राजेश भोसले, अजिंक्य जोशी, प्रणव रावराणे, योगेश शिरसाट, वर्षा उसगांवकर, उदय टिकेकर, उदय सबनीस, संदीप कुलकर्णी हे कलाकार आहेत.

या चित्रपटाबद्दल संजय जाधव सांगतात की, ‘दुनियादारी’ हे माझं ड्रिम प्रोजेक्ट आहे. माझे स्वप्न मी रसिकांसमोर आणताना मला अभिमान वाटतो की, हा चित्रपट माझ्याच नशिबात होता. दुनियादारी’ करण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील होते, पण तो माझ्या हातून घडावा, असे विधिलिखित होते. मी ‘दुनियादारी’चं पाहिलेलं हे स्वप्न माझ्या चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाचं स्वप्न झालं आणि मला या चित्रपटाने जसं झपाटलं तसं यातील प्रत्येकालाच या चित्रपटाने झपाटलं. ही ‘दुनियादारी’ची अंतर्गत जादू होती. या चित्रपटाशी संलंग्न असणा-या प्रत्येकाने या चित्रपटात माझ्या इतकाच जीव ओतला आणि प्रत्येकाचं सहकार्य या चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेलंय. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी सोशल मिडिया नेटवर्कच्या माध्यमातून ‘दुनियादारी’ला तरूणांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. आता प्रदर्शनाची तारीख जवळ येतेय, तसतशी ‘धडधड वाढते ठोक्यात’! आता तो क्षण जवळ येऊन ठेपलाय. १९ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात ‘दुनियादारी’ दिमाखात झळकतोय.

या चित्रपटाची पटकथा आणि संवाद चिन्मय मांडलेकरने लिहिले असून या चित्रपटाला सगळ्या नव्या संगीतकारांनी संगीतसाज चढवला आहे. सचिन पाठक, मंदार चोलकर, मंगेश कंगणे यांनी लिहिलेल्या गाण्यांना से बॅन्ड, पंकज पडघन, अमितराज या संगीतकारांनी बहारदार संगीत दिलेय. चित्रपटाचे छायांकन प्रसाद भेंडे यांचे तर कलादिग्दर्शन महेश साळगावकर यांचे आहे. ७०-८० च्या दशकातील स्टाईल्सचा अनुभव देणारे पोशाख प्रोमिता जाधव आणी अपूर्वा मोतीवाले यांनी केले आहेत.

Leave a Comment