मोदींच्या पंतप्रधान उमेदवारी पदाची जुलैअखेर घोषणा?

नवी दिल्ली दि.९ – या महिन्याच्या म्हणजे जुलैच्या अखेरी भाजप आगामी निवडणुकांत पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करणार असल्याचे भाजपमधील खात्रीलायक सूत्रांकडून समजते. भाजपने आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रीय प्रचार प्रमुख पदी गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची निवड यापूर्वीच केली आहे मात्र पंतप्रधान पदाचे उमेदवार कोण असेल याचे नांव योग्य वेळी जाहीर केले जाईल असे जाहीर केले होते.

मोदींच्या नावावर आता शिक्कामोर्तब झाले असून एकदा का त्यांचे नांव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित झाले की मोदी यांच्या भविष्यातील भूमिकेबाबत जी चर्चा सुरू आहे त्याला पूर्णविराम मिळेलच पण मोदींच्या भूमिकेबाबतची संदिग्धताही मिटेल असे या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ असा की २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांत मोदी विरूद्ध राहुल गांधी असाच सामना पाहायला मिळेल.

भाजपमधील वरीष्ठ नेत्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मोदींच्या पंतप्रधान पद उमेदवारीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मान्यता दिली आहेच. सुरवातीला ज्येष्ठ नेते आडवानी यांच्याकडून कांही विरोध झाला होता मात्र सध्या पक्षात सर्व आलबेल आहे. इतकेच नव्हे तर भाजपचे केवळ कार्यकर्तेच नव्हे तर वरीष्ठ नेत्यांनाही मोदी मतदारांना भाजपकडे आकृष्ट करण्यास पुरेसे समर्थ ठरतील असा विश्वास वाटत आहे. मात्र त्यासाठी त्यांच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत जुलै अखेर ही घोषणा केली जाईल.