आगीत तिरंगा वाचविणार्‍यांच्या तोंडाला सरकारने पुसली पाने

मुंबई दि. ९ – मुंबईत मंत्रालयाच्या भव्य इमारतीला गतवर्षी लागलेल्या भीषण आगीत आपला जीव धोक्यात घालून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ज्या सात शूरवीरांनी राष्ट्राचा मानबिंदू असलेल्या तिरंग्याचे रक्षण केले आणि त्याला कोणताही धोका पोहोचू दिला नाही त्यांना दिलेले आश्वासन राज्य सरकारने पाळलेले नसल्याचे समोर आले आहे. सध्यातरी या कार्यालयाकडून त्या कार्यालयाकडे अशी धावपळ करण्याचे त्यांच्या नशीबी आले आहे.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाने या सात जणांना त्यांनी दाखविलेल्या धैर्याबद्दल मुख्यमंत्री कोट्यातून घरे देण्यात येतील असे घोषित केले होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तशी पत्रे मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविलीही होती. मात्र वर्ष उलटून गेले तरी त्यावर पुढे कांहीच हालचाल झालेली नाही. मंत्रालयाला लागलेल्या आगीत इमारतीचा सहावा मजला भस्मसात होत होता आणि सर्व इमारत धुरांने आणि आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली होती तेव्हा या सात जणांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मंत्रालयावर डौलाने फडकणार्‍या तिरंग्याशेजारी खडा पहारा दिला होता आणि मुख्यमंत्र्यांकडून परवानगी आल्यानंतर तिरंगा सुखरूप उतरवला होता.

सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेले राजेंद्र कानडे, दिपक अडसूळ, प्रेमजी रोझ, सुरेश बरीया, सुरेंद्र जाधव, पंडित केंदळे, विशाल राणे या सात वीरांनी आगीची आणि आपल्या जीवाची पर्वा न करता तिरंगा वाचविला आणि त्यांच्या या धैर्याचे देशातील सुमारे ४५ स्वयंसेवी संस्थांनी सत्कार करून कौतुकही केले. कार्पोरेट क्षेत्रानेही त्यांना बक्षीसे दिली. राजकीय, प्रशासकीय अधिकारी यांनीही कौतुक केले मात्र त्यांनी दाखविलेल्या धीराबद्दल त्यांना मुख्यमंत्री कोट्यातून घरे देण्याची घोषणा केली ती कागदावरच राहिली असे अडसूळ यांनी सांगितले. भाजपने या सात जणांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्याचे आश्वासन दिले आणि ते पाळले असेही ते म्हणाले.

Leave a Comment