पुणे, दि. 6 (प्रतिनिधी)- कोरीया दौर्यावर कुटुंबांना नेताना राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी हा दौरा खासगी असल्याचे मला सांगितले होते, मात्र त्यावर गेल्या काही दिवसांपासून सुरु झालेल्या चर्चेमुळे खरा प्रकार उजेडात आला आहे. त्याची सत्यता पडताळून याबाबत त्यांना जाब विचारला जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला. खुद्द उपमुख्यमंत्र्यांनीच हा थेट इशारा दिल्याने हा दौरा पदाधिकार्यांच्या अंगलट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात आज एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे संकेत दिले. या पदाधिकार्यांनी हा दौरा खासगी असून तो स्वत:च्या पैशातून करायचा आहे असे मला सांगण्यात आले होते, त्यामुळेच त्यांच्या कुटुबिंयाना नेण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसात वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांनुसार आणि चर्चेनुसार खरा प्रकार उघडकीस आला आहे. हा खासगी दौरा असल्याचे मला सांगितल्याने मी त्यांना परवानगी दिली होती, मात्र हा खरा प्रकार उघडकीस आला आहे, त्यामुळे त्याची गंभीर दखल पक्षाने घेतली असून त्याबाबत सत्यता पडताळून पाहण्यात येइल. त्यात सत्यता आढळल्यास सबधितांना त्याबाबत निश्चितपणे जाब विचारला जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
———————————————–