बुद्धगया मंदिर परिसरात साखळी बॉम्बस्फोट

पाटणा: रविवारी पहाटे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी बिहार हादरले आहे. येथील बुद्धगया मंदिर परिसरात आठ बॉम्ब स्फोट झाले आहेत. या परिसरातून पोलिसांना एक जीवंत बॉम्ब सापडला आहे. पहाटे ५ वाजून २५ मिनिटांनी पहिला स्फोट झाला. त्यानंतर प्रत्येक दोन मिनिटांनी आठ स्फोट होत गेले. या स्फोटात सुदैवाने जीवितहानी झालेली नसली तरी चार भाविक जखमी आहेत. दरम्यान या स्फोटामुळे मंदिराचे मात्र कोणतेही नुकसान झालेले नाही.

रविवारी पहाटे पहाटे बिहारस्थित बोधगया महाबोधी मंदिराचा परिसर एकापाठोपाठ झालेल्या बॉम्बस्फोटांमुळे हादरला आहे. सर्वपरिचित अशा महाबोधी मंदिराजवळच आठ स्फोट झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या स्फोटात चार लोक जखमी झालेत.मंदिराला मात्र स्फोटांच्या दाहकतेचा फटका बसलेला नाही. स्फोटानंतर ताबडतोब पोलिसांनी मंदिर परिसर रिकामा केला . हे स्फोट कुणी घडवून आणले याबद्दल माहिती मिळालेली नाही.बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे पाहणी करण्यासाठी बुद्धगयाकडे रवाना झाले आहेत.

महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वीच, इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच गुप्तचर यंत्रणेने या मंदिरावर हल्ला होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला होता. या भीतीमुळे मंदिराच्या मुख्य पुजा-यानी हत्यारे बाळगण्यासाठी परवानगीही मागितली होती. महाबोधी मंदिरात पहाटे चार वाजल्यापासूनच पूजेअर्चेला सुरुवात होते. देश-विदेशांतून आलेले बौद्ध भिख्खू एकत्र येऊन पुजा करतात.

बुद्धगयामध्ये झालेला हल्ला हा अतिरेकी हल्ला असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे पुण्यातील जर्मन बेकरी स्फोटाचा तपास करताना बुद्ध गयावर हल्ला होण्याच्या शक्यतेचा इशारा मिळाला होता
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी पुढचे टार्गेट हे महाबोधी मंदिर होते अशी माहिती दिली होती. त्यानंतर काही दिवस सुरक्षा कडक करण्यात आली होती. पण त्यानंतरही आठच महिन्यात झालेल्या स्फोटांमुळे सुरक्षा व्यवस्थेतला कमकुवतपणा उजेडात आला आहे. या स्फोटाच्या तपासासाठी कोलकात्याहून एनआयएची टीम बिहारला रवाना झाली आहे.