परदेशी पर्यटकांनाही वारी सोहळ्यात सहभागाची संधी

पुणे दि.२९ – दरवर्षी प्रमाणे यंदाही आळंदी देहूतून माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पंढरीच्या विठूला भेटायला सज्ज झाल्या आहेत. मराठी माणसाला वारी म्हणजे काय हे सांगायला नको मात्र ही वारी संस्कृती अमराठी आणि परदेशी पर्यटकांना समजून देण्यासाठी प्रथमच महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने वारी दर्शन ही संकल्पना यदा राबविण्याचे ठरविले आहे.

याविषयी महामंडळाच्या पुणे विभाग अधिकारी नयना बोंदार्डे म्हणाल्या की गेली हजार वर्षे अखंड माऊली आणि तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरास जाते आणि भारताच्या विविध भागातून वारकरी यात सामील होत असतात. वारकर्यांरत मराठी लोकांचे प्रमाण जास्त असते मात्र गेली कांही वर्षे परदेशी पर्यटक, शिक्षणासाठी आलेले परदेशी विद्यार्थी वा अन्य कारणाने आलेले परदेशी नागरिक वारी म्हणजे काय हे समजून घेण्यास उत्सुक असल्याचे आढळले आहे. हे लोक गटाने नसतात त्यामुळे त्यांना वारी काय आहे हे समजून घेता येत नाही.

पर्यटन महामंडळाने यंदा त्यासाठी वारी दर्शन संकल्पना राबविण्याचे ठरविले असून त्यात या परदेशी लोकांना वारी संस्कृतीसंबंधी एक लेक्चर, लोक नृत्ये यांचे दर्शन घडविले जाणार आहेच पण त्याचबरोबर पुण्यात पालख्यांचे आगमन होते तेव्हा अलका टॉकिज चौकापासून ते लक्ष्मी रोड येथील पालख्यांच्या विसावा स्थानापर्यंत त्यांना मिरवणुकीतही सहभागी करून घेतले जाणार आहे. सर्व माहिती देण्यासाठी दुभाषांची सोय करण्यात आली आहे. यंदा ५० परदेशी नागरिकांना ही संधी दिली जाणार आहे.