उत्तराखंडमधील रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण

डेहराडून- गेल्या दहा दिवसांपासून उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थरळी हालविण्याचे काम सुरू होते. लष्काराच्यावतीने सुरू असलेले हे रेस्क्यू ऑपरेशन आता पूर्ण झाले आहे. परंतु, पुराच्या गाळात अडकलेले शव मात्र अजूनही त्याठिकाणी फसलेले आहेत. हे शव बाहेर काढण्याचे काम आता प्रशासनाला करायचे आहे. दरम्यान काही जणांवर येथे अंत्यरसंस्कार करण्यात आले.

गेल्यां काही दिवसांपासून केदारनाथच्या खो-यात रोगराई पसरण्याचा धोका मोठ्या प्रमाणात बळावलाआहे. साथीचे रोग पसरण्याची भीती असल्यामुळे सडलेल्या मृतदेहांवर घाईघाईत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यातही सतत पाऊस कोसळत असल्याने या कार्यातही अडथळे येत आहेत. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्यांचे डीएनए जपून ठेवण्यात येत आहेत.

उत्तराखंडमधील आरोग्य विभागाने नदीचे पाणी दूषित झाल्याची चेतावणी येथील नागरिकांना दिली आहे. त्या मुळे याठिकाणचे पाणी कोणीच पिऊ नये अशी सूचना सातत्याने केली जात आहे. केदारनाथ मंदिरच्या आसपासच्या भागातही गाळात फसलेल्या आणि सडलेल्या मृतदेहांमधून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.