मुन्नाभाई स्लो लर्नर ?

पुणे दि.२८ – बॉलिवूड अभिनेता आणि मुंबई साखळी बॉम्बस्फोट अवैध शस्त्रप्रकरणात येथील येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला मुन्माभाई संजय दत्त स्लो लर्नर आहे. या जेलमध्ये येऊन त्याला आता ४० दिवस लोटले आहेत आणि येथे त्याला अजून ४२ महिने काढायचे आहेत. येथे त्याला कागदी पिशव्या बनविण्याचे काम देण्यात आले आहे मात्र गेल्या ४० दिवसांत विशेष प्रशिक्षण देऊनही संजूबाबा एकही पिशवी बनवू शकलेला नाही असे समजते.

वास्तविक सुरवातीला मुन्माभाईला जेल किचनमध्ये काम देण्याचे ठरविले गेले होते. मात्र त्याच्या सुरक्षेला धोका पोहोचू नये म्हणून सर्वात सोपे कागदी पिशव्या बनविण्याचे काम त्याला दिले गेले. तेही पेपर बॅग कारखान्यात न जाता बराकीत बसूनच त्याने हे काम करायचे आहे. कारण पुन्हा सुरक्षा प्रश्न. त्यासाठी त्याला स्वतंत्र प्रशिक्षक दिला गेला आहे मात्र इतके दिवस लोटूनही संजूबाबा एकही कागदी पिशवी योग्य प्रमाणात बनवू शकलेला नाही असे येथील अधिकार्‍यांनी सांगितले.

येरवडा मध्यवर्ती कारागृह सुपरिटेंडेंट योगेश देसाई म्हणाले की संजूबाबा जेव्हा योग्य प्रमाणात पिशव्या बनवू लागेल तेव्हापासूनच त्याला त्याबद्दलचा मेहनताना मिळू शकेल. तो किती पिशव्या बनवितो यावर त्याला २५ ते ४० रूपयांदरम्यान मजुरी मिळू शकणार आहे. त्याची कारागृंहातील वर्तणूक चांगली आहे आणि त्याला घरचे अन्न दिले जात नाही तर जेलमधील अन्नच त्याला दिले जाते असेही ते म्हणाले. संजयची वर्तणूक चांगली राहिली तर त्याला शिक्षेतून थोडी सूट मिळण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.

Leave a Comment