फू बाई फू’चे महाविजेते भाऊ कदम आणि सुप्रिया पाठारे

कॉमेडीचा झणझणीत तडका अर्थात झी मराठीवरील हिट कार्यक्रम ‘फू बाई फू – कॉमेडीचे धारकार्ड’ या दणेकेबाज पर्वाच्या विजेतेपदावर आपली ठसठशीत मोहोर उमटवली ती कॉमेडीचे दमदार खेळाडू सुप्रिया पाठारे आणि भाऊ कदम यांनी ! नुकतीच ‘फू बाई फू’ची महाअंतिम फेरी ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात रंगली. कुशल बद्रिके-हेमांगी कवी, विजय पटवर्धन – क्षिती जोग,
ऋषिकेश जोशी आणि लीना भागवत, प्रियदर्शन जाधव आणि हेमंत ढोमे यांच्याबरोबर सुप्रिया पाठारे आणि भालचंद्र उर्फ भाऊ कदम या पाच जोड्यांपैकी महाअंतिम फेरीत बाजी मारली ती भाऊ कदम आणि सुप्रिया पाठारे यांनी. प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्याहस्ते महाविजेत्या जोडीला गौरवण्यात आले. या महाअंतिम फेरीत हास्याचे चौकार -षटकार रसिकांनी अनुभवले आणि हास्याच्या दणदणाटात आणि टाळ्यांच्या गजरात कॉमेडीचा जल्लोढ साजरा झाला.

गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्राला खळखळून हसवणारे ‘फू बाई फू’चे हे पर्व मराठी रंगभूमीवर मोलाचे योगदान देणा-या आजच्या विनोदविरांनी गाजवले आणि याच कलावंतांमधील काहींच्या विनोदी लेखनाने ते जबरदस्त वाजवले देखिल. या पर्वात विनोदवीरांनी विनोदाचा एक वेगळा सूर गवसला आणि रसिकांना मार्मिक आणि दर्जेदार विनोदाची अभूतपूर्व मेजवानी मिळाली. सगळ्याच विनोदी कलावंतांनी या सिझनमद्ये कॉमेडीचे आधारकार्ड खणखणीत वाजवले. तरीही
स्पर्धा असल्यामुळे महाअंतिम फेरीत दाखल होण्याचा मान मिळाला तो वरच्या पाच जोड्यांना. मिळालेल्या संधीचे सोने करत या पाचही जोड्यांनी आपल्या भात्यातील विनोदाची धारदार अस्त्रे बाहेर काढली आणि रसिकांना हसवून हसवून अक्षरश: लोळवले. यात कहर केला तो भाऊ कदम आणि सुप्रिया पाठारे यांनी. आपल्या एन्ट्री पासूनच टाळ्यांचा कडकडाट मिळवत दोघांनी सभागृह दणदणून टाकले.

पोट धरधरून लावणारा आणि हसता हसता डोळ्यात टचकन पाणी उभे करणा-या ‘फू बाई फू’ या हास्याच्या लोटपोट यात्रेत मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरील कलाकारांनी उत्स्फूर्त हजेरी लावली. ‘दुनियादारी या आगामी चित्रपटाचे कलाकार अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, उर्मिला कानेटकर, सुशांत शेलार आणि अन्य कलाकार हजर होते. तर ‘नांदी’ या नाटकातील अविनाश
नारकर, प्रसाद ओक, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, अजय पूरकर, स्पृहा जोशी, निर्माते प्रसाद कांबळी, संगीतकार राहुल रानडे उपस्थित होते. यांच्याबरोबर नाट्यदिग्दर्शक मंगेश कदम, अतुल परचुरे, पुषकर श्रोत्री, स्वाती चिटणीस, उज्वला जोग, पूर्वा गोखले, अंगद म्हसकर, शर्मिष्ठा राऊत,
रवी जाधव, लेख सचिन मोटे अशा अनेक कलावंतांच्या मांदियाळीसह ‘फू बाई फू’ चा रंगतदार सोहळा संपन्न झाला. कॉमेडीचा बहार हास्याची ही भन्नाट अदाकारी येत्या रविवारी, २३ जूनला सायंकाळी सात वाजता झी मराठीवर रसिकांना अनुभवता येणार आहे.

Leave a Comment