अखेर दीपिकाला मिळाली सुट्टी

एकापाठोपाठ एक सफल चित्रपट देणारा दिग्दर्शक रोहित शेट्टीचा बॉलीवूडमध्ये चांगलाच दबदबा आहे. बहुधा म्हणूनच त्याला सगळे टरकून असतात. त्याच्या या दबदब्यामुळे मागे जितेंद्रने आपल्या ‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई अगेन’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती आणि आता संजय लीला भन्साळीनेही आपल्या रामलीला चित्रपटाच्या शेड्युलमधून त्यातील नायिका दीपिका पदुकोनला दोन आठवड्यांची सुट्टी दिली आहे. कारण काय तर तिला रोहितच्या चेन्नई एक्स्प्रेसच्या प्रमोशनसाठी वेळ देता यावा म्हणून. भन्साळी आपल्या रामलीलाचे चित्रण वेगाने उरकून घेत आहे.

आपल्या चित्रणाच्या कार्यक्रमाबाबत तो किती वक्तशीर आहे, हे सगळय़ांनाच माहीत आहे. मोठय़ा युनिटला सोबत घेऊन तो काम करतोच, शिवाय प्रत्येकाच्या कामाची अतिशय छोट्या वेळेमध्ये विभागणी केलेली असते. खरेतर या चित्रपटाचे चित्रण पावसामुळे लांबले आहे, पण असे असूनही त्याने दीपिकाला तिच्या लवकरच प्रदर्शित होणार्‍या चेन्नई एक्स्प्रेससाठी दोन आठवड्यांची रजा मंजूर केली.

विशेष म्हणजे दीपिकाने त्याच्याकडे फक्त दोन दिवसांच्या सुट्टीची मागणी केली होती, पण त्याने मात्र अजिबातही आढेवेढे न घेता न रागवता तिला पूर्ण दोन आठवड्यांचा ब्रेक दिला. चेन्नई एक्स्प्रेसच्या प्रसिद्धीसाठी दीपिकालाही सुट्टी हवी होती व भन्साळीने ती मंजूर केल्याने सध्या ती खूश आहे. भन्साळी स्वत: एक निर्माता असल्याने चित्रपटाच्या प्रमोशनची किती आवश्यकता असते, हे त्यालाही कळते आणि नंतर आम्हाला रामलीलाचेही प्रमोशन करायचे आहे, असे ती सांगते. भन्साळीला खरोखरच चित्रपटाच्या प्रमोशनचे महत्त्व माहीत आहे म्हणूनच त्याने दीपिकाला दोन दिवस सोडून दोन आठवड्यांची मुभा दिली.

Leave a Comment