बायो फोर्टिफाईड सीडस्

कृषी संशोधनातला नवा आविष्कार
महाराष्ट्रात सत्तरच्या दशकात ज्वारीच्या संकरीत बियाणांचा शोध लागला होता. ती ज्वारी हायब्रीड म्हणून लोकप्रिय झाली. त्या वाणाचे शास्त्रीय नाव सीएसएच १ आणि सीएसएच २ असे होते. दुष्काळामध्ये विशेषतः ७१ ते ७५ या काळात ती हायब्रीड ज्वारी मोठ्या प्रमाणावर पिकवलीही गेली आणि खाल्लीही गेली. परंतु हायब्रीड ज्वारी खाणार्‍यांची तक्रार होती की या ज्वारीच्या कितीही भाकरी खाल्ल्यातरी पोट भरत नाही आणि अंगात ताकदही राहत नाही. ही तक्रार खरी होती कारण ही हायब्रीड ज्वारी निकस होती. जनावरे तर या ज्वारीच्या कडब्याला तोंडसुध्दा लावत नसत. त्यामुळे हळूहळू करीत ही ज्वारी मागे पडली आणि आता ती फारशी वापरातही नाही.

आपल्या देशात कृषी संशोधन करताना अधिक उत्पादन देणारे वाण शोधण्याकडे कल असतो. तशा काही संकरित जाती शोधल्याही गेल्या. त्यानंतर जनुक शास्त्रावर आधारलेले बीटी बियाणे बाजारात आले. भारतात केवळ कापसाच्या बीटी वाणांना उत्पादनाची अनुमती आहे. बाकीच्या कोणत्याही बीटी धान्यांना परवानगी दिली जात नाही. या अडचणीवर मात करून आता शास्त्रज्ञांनी फोर्टिफाईड बियाणे विकसित केले आहे. या बियाणांचा विकास करताना संकरीत वाण तयार करताना वापरले जाणारे तंत्रज्ञान वापरले जाते. परंतु त्यात काही बदल करून हे बियाणे विशिष्ट वातावरणात तयार केले जाते. त्यामुळे त्यांचे उत्पादन वाढत नाही मात्र त्यातील सकसपणा वाढतो. अशा सकस बियाणांनाच फोर्टिफाईड सीडस् असे म्हटले जाते.

हैदराबाद येथील इक्रीसॅट म्हणजे इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमी एरिड ट्रॉपिक्स या संस्थेने अधिक सकस असे बाजरीचे बियाणे विकसित केले आहे. आपण सध्या जी बाजरी वापरतो त्या बाजरीमध्ये लोहाचे प्रमाण ३० पीपीएम (पार्टस् पर मिलियन)असे असते. मात्र इक्रीसॅटने शोधलेल्या आयसीटीपी ८२०३ या बाजरीच्या वाणामध्ये लोहाचे प्रमाण नेहमीच्या दुप्पट म्हणजे ६० पीपीएम एवढे असते. महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यात या बाजरीचे पीक घेण्यात आले आहे. ही बाजरी खाणार्‍या अनेक महिलांना लोहाच्या कमतरतेमुळे होणार्‍या विकारांपासून सुटका मिळाली आहे.

अशाच तर्‍हेने इक्रिसॅट तर्फे गव्हाचेही फोर्टिफाईड बियाणे तयार करण्यात आले आहे. या बियाणांमध्ये झिंकचे प्रमाण प्रचलितवाणांपेक्षा जास्त आहे. या गव्हामधून तो खाणार्‍या व्यक्तिला झिंक हे पोषणद्रव्य विपुल प्रमाणात मिळते आणि त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. अशा गव्हाच्या १७ जाती शोधून काढण्यात आल्या आहेत.

इक्रिसॅटने भारतातले हे प्रयोग अमेरिकेतील हार्वेस्ट प्लस या संस्थेच्या मदतीने सुरू केलेले आहेत. त्यातून आता बीटा कॅरोटीनचे प्रमाण अधिक असणार्‍या मक्याचाही शोध घेतला जात आहे. प्रायोगिक तत्वावर हे बियाणे यशस्वी झाले आहे. त्यापुढे जाऊन काही द्विदल धान्ये, स्वीट पोटॅटो ही पिके घेतली जाणार आहेत. बीटा कॅरोटीनमुळे कॅन्सर प्रतिबंधक शक्ती वाढते आणि अ जीवनसत्त्वाचा पुरवठा झाल्याने डोळ्यांचे आरोग्यही सुधारते. या प्रायोगिक तत्त्वावरील बियाणांना लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.