लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने लावली फिल्डींग

नवी दिल्ली – आगामी २०१४च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आता सर्वच पक्षने सुरु केली आहे. भाजपने निवडणुकीची सूत्रे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद मोदी यांच्याकडे दिल्यानंतर आता काँग्रेसने फिल्डींग लावली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी २१ जणांची नवी टीम जाहीर केली. त्यामध्ये मुंबईतले खासदार गुरुदास कामत यांच्यावर सरचिटीणीसपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. पक्ष विस्तरासाठी केंद्रीय मंत्रीमंडळातून राजीनामा देणारे सीपी जोशी आणि अजय माकन यांच्याकडे सरचिटणीस पदाचा भार सोपविण्यात आला आहे.

काही दिवसापूर्वीच राहुल गांधींची उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यांनतर काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नवी टीम जाहीर केली आहे. २१ सदस्यांच्या कार्यकारिणीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांचाही समावेश आहे. काँग्रेस नेता जनार्दन द्विवेदी यांनी याची घोषणा केली.

रविवारी माजी केंद्रीय मंत्री अजय माकन आणि सी. पी. जोशी यांना अंबिका सोनी, गुरुदास कामत यांच्याबरोबरीने सरचिटणीसपदाची सूत्रे सोपविण्यात आली. नव्या दमाच्या व्यक्तींना पक्षांतर्गत जबाबदारी सोपविताना काँग्रेसने मावळते सरचिटणीस गुलाम नबी आझाद आणि ऑस्कर फर्नांडिस यांना बाजूला सारले आहे. सोनिया गांधी यांनी आपले राजकीय सल्लागार म्हणून पुन्हा अहमद पटेल यांच्यावर विश्वास दाखविला आहे.

राहुल गांधींचे निकटवर्तीय, गुजरातमधील मधूसुदन मिस्री यांच्याकडे केंद्रातील सत्तेचे तिकीट असणा-या उत्तर प्रदेशची सूत्रे सोपविण्यात आली आहेत. वगळलेल्या अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये सरचिटणीस विलास मुत्तेमवार, बीरेंद्र सिंह, जगमीतसिंग ब्रार, जगदीश टायटलर, आणि गुलचैन सिंग चरक यांचा समावेश आहे. खासदार प्रिया दत्त माकन यांना सहकार्य करणार आहेत.