१९ वर्षांखालील भारतीय संघाचे नेतृत्व विजय झोलकडे

जालना: १९ वर्षांखालील संघांच्या तिरंगी मालिकेचे ऑस्ट्रेलियात आयोजन करण्यात आले आहे. ३० जूनपासून सुरु होणा-या या मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियासह भारत आणि न्यूझीलंड संघांचा समावेश आहे. १९ वर्षांखालील वयोगटाच्या भारतीय संघाच्या कर्णधारपदी जालना जिल्ह्यातील विजय झोलची निवड करण्यात आली आहे. विजय झोलच्या निवडीनंतर जालन्यात आनंदोत्सव साजरा झाला. विजयच्या घरी त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रपरिवाराने फटाके फोडून आणि मिठाई वाटून आपला आनंद व्यक्त केला.

या तिरंगी मालिकेसाठी बीसीसीआयच्या ज्युनियर निवड समितीने भारताचा संघ जाहीर केला असून, भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्त्व विजय झोलच्या हाती सोपवण्यात आलं आहे. तर राजस्थान रॉयल्सकडून यंदाची आयपीएल गाजवणारा संजू सॅमसनला भारताच्या युवा संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. जालन्याचा विजय झोल मधल्या फळीतला डावखुरा फलंदाज आहे. रणजी ट्रॉफीत विजय महाराष्ट्राचे प्रतिनिधित्त्व करतो.

डिसेंबर २०११ मधल्या कूचबिहार ट्रॉफी सामन्यात विजय झोलने महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील संघाकडून आसामविरुद्ध खेळताना विजयने ४६७ चेंडूंमध्ये नाबाद ४५१ धावांची खेळी केली होती. गेल्या वर्षी १९ वर्षांखालील वयोगटाचा विश्वचषक जिंकणा-या भारताच्या युवा संघातही त्याचा समावेश होता. त्या विश्वचषकात विजयने सहा सामन्यांमध्ये २५.१६च्या सरासरीने १५१ धावा फटकावल्या होत्या.

Leave a Comment