गोव्याच्या निसर्गरम्य भूमीत रूजलेली गुलाबी कथा ‘प्रेमसूत्र’

‘फिन क्राफ्ट’ आणि ‘क्षितिज एन्टरटेन्मेंट’ निर्मित, तेजस विजय देऊस्कर दिग्दर्शित गोव्याच्या निसर्गरम्य भूमीत रंगलेला ‘प्रेमसूत्र’ हा चित्रपट येत्या 21 जून 2013 रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होतोय. प्रत्येक सिनेमाची आपली एक मर्यादा असते. कधी ही मर्यादा कालमानाची असते,
तर कधी सिनेमाच्या जॉनरची.. कधी कथेशी निगडीत असलेल्या पात्रांची, तर कधी प्रेक्षकराजाच्या आवडीची..याहीपेक्षा महत्वाची म्हणजे सिनेमाचा रंग, रूप आणि मूड यावरही ही मर्यादा अवलंबून असते.. त्यामुळेच चित्रीकरणस्थळ निवडणं ही सिनेमासाठी मुख्य मर्यादा असते.. कदाचित याच कारणामुळे एखाद्या दिग्दर्शकाला जेव्हा रूपेरी पडद्यावर प्रेमकथा चितारायची असते तेव्हा तो
निसर्गरम्य स्थळांचा शोध घेत असतो. याबाबतीत अग्रगण्य आणि रसिकांच्या ओठांवर सहज रूळलेलं स्थळ म्हणजे गोवा.

‘प्रेमसूत्र’ची प्रेमकथा बहरण्यासाठी अनुकूल असलेली लोकेशन्स, नयनरम्य समुद्रकिनारे आणि एकूनच गोव्यातील वातावरण हे ही प्रेमकथा फुलवण्यासाठी अनुकूल असल्याने दिग्दर्शक तेजस विजय देऊस्कर यांनी ‘प्रेमसूत्र’च्या चित्रीकरणासाठी गोव्याच्या निसर्गरम्य भूमीची निवड केली.आजवर बॉलीवूडपासून टॉलीवूडपर्यंत म्हणजेच दक्षिणात्य सिनेदिग्दर्शकांपर्यंत सर्वांनाच गोव्याच्या निसर्गाने भुरळ पाडली आहे. असे असले तरी दिग्दर्शक तेजस देऊस्कर यांनी
‘प्रेमसूत्र’साठी लोकेशन्स निवडतना आजवर कधीही पडद्यावर न आलेल्या जास्तीत जास्त लोकेशन्सची निवड केली हे या सिनेमाचे वैशिष्टय आहे.

निसर्गाच्या अद्भुत सौंदर्यांचं वरदान लाभलेल्या गोव्यानं मनोहारी दर्शन घडवण्याची कला ‘प्रेमसूत्र’चे छायालेखक पुष्पांक गावडे यांना अचूकपणे जमली आहे. गोव्यासोबतच मुंबई, पुणे यासारख्या ठिकाणी ‘प्रेमसूत्र’चं चित्रीकरण करणं ही या सिनेमाची जणू गरजच होती हे सिनेमा पाहताना रसिकांना जाणवलेचं.आजवर बर्‍याच सिनेमांमध्ये गोव्याचं दर्शन घडलं असलं तरी अद्यापही गोव्यातील निसर्गाचं वरदान लाभलेला असा काही भाग शिल्लक आहे, जो आजवर कधीही रूपेरी पडद्यावर आलेला नाही.

आमच्या टिमने अशीच लोकेशन्स शोधून, तिथे चित्रीकरण केल्याचं दिग्दर्शक तेजस विजय देऊस्कर आणि प्रमुख अभिनेते संदीप कुलकर्णी दिलखुलासपणे सांगतात. ‘प्रेमसूत्र’मध्ये संदीपसोबत पल्लवी सुभाष मुख्य भूमिकेत असून श्रुती मराठे, लोकेश गुप्ते, शिशिर शर्मा, ईला भाटे, शुभा खोटे, प्रसाद पंडित, प्रदिप आठवले आदी कलाकारांच्याही यात भूमिका आहेत. ‘प्रेमसूत्र’ची संकल्पना संदीप कुलकर्णी यांची असून कथा-पटकथा प्रसाद मिरासदार आणि तेजस विजय देऊस्कर यांची आहे. संवाद महेंद्र तेरेदेसाई यांनी लिहिले आहेत. सुस्मित लिमये यांनी ‘प्रेमसूत्र’ला संगीत दिलं असून अपूर्वा मोतीवाले आणि आशिष म्हात्रे यांनी संकलन केलं आहे.गोव्याच्या निसर्गरम्य भूमीत रंगलेला ‘प्रेमसूत्र’ 21जून रोजी रसिकांच्या भेटीला येत आहे.