आता मल्लिका रचणार स्वयंवर

बॉलीवूडची बिनधास्तबाला मल्लिका शेरावतही आपल्यासाठी मिस्टर राईट शोधण्यासाठी राखी सावंतच्या पावलावर पाऊल ठेवत टीव्हीला शरण आली आहे. ३६ वर्षीय मल्लिका आता ‘द बॅचरल ऑफ इंडिया-मेरे खयालों की मल्लिका’ या शोमध्ये आपला जीवनसाथी निवडताना दिसणार आहे. अमेरिकेतील द बॅचलर या शोवर आधारलेला हा शो लाईफ ओकेवर येणार आहे. मल्लिकाने आपल्या स्वप्नातील राजकुमाराविषयी काही गोष्ट स्पष्ट केल्या आहेत. शिकलेला व परिपक्व
असण्यासोबतच आपला जोडीदार स्वकर्तृत्वाने व मेहनतीने मोठा झालेला असावा.

सगळ्य़ात महत्त्वाचे म्हणजे तो फक्त प्रियकरच नसावा व मित्रही बनला पाहिजे, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली. आयुष्यात खतरनाक प्रसंगांना धैर्याने सामोरे जाणारे लोक पसंत असलेल्या मल्लिकाला या शोमध्ये आपला मिस्टर राईट मिळेलही, पण त्यासाठी सध्या तिला आणखी वाट पाहावी लागणार आहे. मल्लिकाला खतरों का खिलाडी मिळवून देणार्‍या या शोचे चित्रीकरण
राजस्थानमध्ये होणार असून ऑगस्टपासून तो टीव्हीवर प्रसारित होईल. या शोमध्ये मल्लिकाला आपला मिस्टर राईट मिळेल की नाही, याबाबत आत्ताच काही सांगितले जाऊ शकत नसले तरी या शोसाठी अजूनही होस्टचे नाव निश्‍चित होऊ शकलेले नाही.

‘उतरन’ मालिकेतील जोगी ठाकूर म्हणजे अयुब खानने या शोचे सूत्रसंचालन करण्यास नकार दिला आहे. या मालिकेतून थोडाही वेळ काढणे त्याला शक्य होत नाही. त्याच्या नकारानंतर समीर सोनीशी चर्चा करण्यात आली, पण अजून काहीच नक्की झालेले नाही. दुसरीकडे विकी डोनरफेम आयुष्यमान खुराणाच्या नावाची होस्टच्या रूपात चर्चा होत आहे, आता त्यांच्यातून कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, ते समजेलच. याआधी राखीप्रमाणेच रतन राजपूत व राहुल महाजन यांनीही छोट्या पडद्यावरच आपला जीवनसाथी निवडण्यासाठी आले होते. त्यांच्यापैकी फक्त राहुल महाजनलाच टीव्ही स्वयंवराद्वारे आपली अर्धांगिनी डिम्पी मिळाली होती व त्यांचा संसारही सुरळीत सुरू आहे. या दोघांनी ते टीव्हीवरील रिअँलिटी शोच्या सेटवरच सातफेरे घेतले होते.

Leave a Comment