मधुकरराव पिचड यांच्यासह पाच मंत्र्यांचा शपथविधी

मुंबई दि.११ – राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज नव्या पाच मंत्र्यांचा शपथविधी राजभवनात पार पडत आहे.  राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मधुकरराव पिचड, शशिकांत शिंदे, अपक्ष आमदार दिलीप सोपल, संजय सावकारे आणि उदय सामंत यांची मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. पैकी शिंदे आणि सोपल यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले गेले आहे तर  सावकारे आणि सामंत यांना राज्यमंत्रीपद दिले जात आहे.

गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व २० मंत्र्यांचे राजीनामे घेऊन मंत्रीमंडळ बदलाची सूचना दिली होती. त्यानंतर काल रात्री उशीरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरील आमदारांच्या नावाची यादी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सूपूर्द केली असे समजते. गुलाबराव देवकर, भास्कर जाधव, लक्ष्णम ढोबळे, रामराजे निंबाळकर आणि बबनराव पाचपुते यांच्या जागी वरील पाच आमदारांची मंत्री म्हणून नेमणूक केली गेली आहे.

मधुकरराव पिचड नगर जिल्ह्यातील अकोल्याचे आमदार आहेत तर शशिकांत शिंदे सातारा जिल्ह्यातील कोरेगांवचे आमदार आहेत. सोपल अपक्ष असून ते बार्शीचे आहेत, उदय सामंत रत्नागिरी तर सावकारे जळगांवचे आहेत.