पुणे,दि.30( प्रतिनिधी): पुण्यातील तरुण पिढी ‘शार्प’ आहे, त्यामुळे ती निश्चित आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्याला निवडून देतील, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केला. . ते म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तरुण वर्गाच्या खूप काही अपेक्षा आहेत.आपल्याला या नव्या पिढीने सर्वत्र चांगला प्रतिसाद दिला आहे, येथेही यशाची चांगली शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच कामाला लागूया’ मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सकाळी पुण्यात दाखल झाले . त्यांनी पीवायसी जिमखाना येथे मनसे पदाधिकार्यांशी चर्चा केली. आमदार नितीन सरदेसाई, राजन शिरोडकर, रिटा गुप्ता, अनिल शिदोरे हे पुणे शहरातील कामकाज पाहतील, असे राज यांनी स्पष्ट केले. यावेळी महापालिकेतील मनसेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, शहर पदाधिकारी उपस्थित होते.
पुण्यात मनसेचाच खासदार : राज ठाकरे
राज ठाकरे यांनी पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना काही मोलाचे सल्ले दिले. नगरसेवक व कार्यकर्ता यात वेगळेपणा जाणवू देऊ नका. कार्यकर्ते हे आपल्याच खांद्याला खांदा लावून काम करत असतात. त्यामुळे त्यांना विश्वासात घ्या, विश्वास द्या. पक्ष कसा वाढेल, याकडे लक्ष द्या. लोकांच्या स्मरणात राहतील, अशी कामे करा. मनसेकडून नव्या पिढीला खूप अपेक्षा आहेत. अपेक्षाभंग होऊ न देणे, ही प्रत्येक मनसैनिकाची जबाबदारी आहे. तरुणांना काय हवे, हे ओळखले पाहिजे. त्यांना जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्यांच्या ते मनात रुजेल. तरुणांचा मनसेकडेच ओढा आहे. त्यामुळे जातीचे राजकारण न करता कामे करा. सर्वांना बरोबर घ्या. अपेक्षित रिझल्ट मिळतील. आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागा. पुण्याचा खासदार हा मनसेचाच असणार आहे, याची मी आपणाला ग्वाही देतो, असा विश्वासही राज ठाकरे यांनी पदाधिकार्यांना दिला.
