बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी

मुंबई, दि.30 – राज्याचा बारावी परीक्षेचा निकाल आज गुरूवारी (दि.30) जाहीर झाला आहे. राज्यातील 79.95 टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यंदा कोकण विभागाने अव्वल स्थान पटकावले आहे. कोकण विभागाचा निकाल 85.88 टक्के निकाल लागला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 84.06 टक्के तर 76.62 टक्के मुलांनी यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांना सहा जूनला दुपारी तीननंतर महाविद्यालयातून गुणपत्रक मिळतील. विद्यार्थ्यांना या निकालाची प्रत ऑनलाईन काढता येईल. हीच गुणपत्रक प्रत प्रवेशासाठी अधिकृत मानली जाणार असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मूळ गुणपत्रिकेची वाट पाहावी लागणार नाही.

सहा जून रोजी कनिष्ठ महाविद्यालयांना तपशीलवार गुणांचे अभिलेख आणि विद्यार्थ्यांचे गुणपत्रक देण्यात येईल. याच दिवशी दुपारी तीनपासून विद्यार्थ्यांना त्यांचे गुणपत्रक वितरित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करायची असेल, तर मूळ गुणपत्रिका मिळाल्यानंतर 17 जूनपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करता येतील. इंटरनेटवरील गुणपत्रिकेच्या आधारे गुणपडताळणी करता येणार नाही, असे मंडळाचे विभागीय सचिव अनिल गुंजाळ यांनी स्पष्ट केले आहे. परीक्षेत सर्व विषयांत उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारणेसाठी ऑक्टोबर 2013 आणि मार्च 2014 अशा दोन संधी उपलब्ध करून देण्यात येतील, असेही गुंजाळ यांनी सांगितले.

बारावीचा विभागवार निकाल पुढीलप्रमाणे- पुणे- 81.91 टक्के, नागपूर 73.10 टक्के , औरंगाबाद – 85.26 टक्के, मुंबई – 76.81 टक्के, कोल्हापूर – 84.14 टक्के, अमरावती – 82.19 टक्के, नाशिक – 79.01 टक्के, लातूर – 83.54 टक्के, कोकण – 85.88 टक्के इतका लागला आहे.

Leave a Comment