रेन वॉटर हार्वेस्टींग – काळाची गरज

दुष्काळ… दुष्काळ म्हणजे नेमके काय आणि दुष्काळ पडतो कसा? तो पडूच नये म्हणून मानव प्राण्याची अशी काही खास जबाबदारी आहे का? आणि असेल तर ती कोणती? आपण ती योग्य तर्हेने पार पाडतो का? असे एक ना अनेक प्रश्न या दुष्काळ शब्दाच्या भोवताली घुटमळतात. काहीजण या दुष्काळाचे राजकारण करून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात. एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करून त्याकडे दुर्लक्ष करण्यासारखा हा विषय नाही याची जाण असणे आवश्यक आहे. दुष्काळ निवारण ही कोणा एक दोघांची जबाबदारी नाही. तर देशातील प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्य आहे.

पाण्याची व अन्नस्रोतांची अनुपलब्धता किंवा तीव्र टंचाई असलेला अनेक महिन्यांचा किंवा वर्षांचा दीर्घ कालखंड म्हणजे दुष्काळ होय. दुष्काळ येण्यास वातावरणातील आकस्मिक बदल, वृक्षतोड, ज्वालामुखींचे उद्रेक किंवा वणवे इत्यादी कारणांनी उद्भवलेले पर्यावरणीय जलचक्रातील दोष कारणीभूत असू शकतात. दुष्काळात अन्नपाण्याच्या अभावी माणसांसह बहुसंख्य सजीवांना मोठ्या संकटास सामोरे जावे लागते. जेथे दुष्काळ पडतो, त्या ठिकाणची उत्पादकता आणि एकंदरीत परिस्थिती पुन्हा सावरणे खूप कठिण असते. तेथे जीवन पूर्ववत होण्यास काही वर्षांचा कालीवधी लागू शकतो. त्यामुळे यावर उपाययोजना शोधताना त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या न राबविता दीर्घकालीन, शाश्वपत अशा असतील तर अशी परिस्थिती पुन्हा येणार नाही.

शाश्वत उपाययोजनामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. परंतु, त्यामध्ये समाविष्ठ असणारी एक गोष्ट आपण कमीत कमी खर्चात राबविली तर दुष्काळाची तीव्रता कमी करण्यास त्याचा नक्की फायदा होईल, ती पद्धत म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग.

यंदा अगदी जानेवारी- फेब्रुवारीपासूनच प्रसारमाध्यमांतून पाणीटंचाईच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. दुष्काळ फक्त एखाद्या जिल्ह्यात किंवा राज्यात नाही, तर त्याने संपूर्ण देशाला आपल्या कवेत घेतले आहे. अनेकजण बोलताना म्हणतात की, १९७२ साली भयानक दुष्काळ पडला होता. मात्र, २०१३ चा दुष्काळ त्याही पेक्षा भयानक आहे. या काळात आपण टंचाई भागाचा आढावा घेऊन त्यांना आवश्यक तेवढ्या पाण्याचा, चार्‍याचा, खाद्याचा तसेच इतर अत्यावश्यक गोष्टींचा पुरवठा केला. मात्र, ज्या भागात नियोजनशुन्य कामकाज चालते त्याठिकाणी मदतीचा कितीही पुरवठा केला तरी तो कमीच असतो. नियोजन हे पुढील समस्यांचे, संकटांचे केले जाते, त्याच पद्धतीने आगामी काळातील नियोजन करण्यासाठी आता प्रत्येक नागरिकाने पावसाळ्यापूर्वी आपल्या घराच्या छतावर पडलेले पावसाचे पाणी वाहून नदी-नाल्यावाटे जाणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे नेमके काय करायचे? पावसाळ्यात घराच्या छतावर साठणारे पावसाचे पाणी छताच्या उताराच्या बाजूने पाईप लावून खाली घ्यायचे. पाईपद्वारेच हे पाणी विहिरीजवळच्या शोषखड्ड्यात किंवा ते वाहून न जाता जमिनीत मुरेल अशा प्रकारे सोडायचे. जवळपास पाच बाय पाच फुटाचा हा खड्डा पाचसहा फूट खोल असावा लागतो. त्या खड्ड्यात मोठे दगडं दोन फुटापर्यंत टाकायचे, त्यानंतर मध्यम आकाराचे दगड, त्यानंतर जवळपास दोन फूट गिट्टी आणि त्यावर वाळू असं सारं करून घ्यायचे. हे करण्यासाठी थोडाफार खर्च होईल पण एका कुटुंबाला आयुष्यभर पुरेल एवढ्या पाण्याची सोय नक्कीच होते.

या रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा जलपुनर्भरणसाठी केला जाणारा खर्च, खर्च नसून ती भविष्यकाळाची गुंतवणूकच आहे. ज्यांच्याकडे नळाला चोवीस तास पाणी येते, ज्यांनी पाण्याचा दुष्काळ कधी अनुभवलेलाच नसतो, त्यांना कदाचित या जलपुनर्भरणाचे फारसे महत्त्व वाटणार नाही. पण आज पर्यावरणाची परिस्थिती पाहता, भूगर्भातील पाणी संपायलाही फारसा वेळ लागणार नाही. तेव्हा मला वाटते पाणी हे तुमचे- आमचे किंवा कोणाच्या एकट्याच्या मालकीचे नसते. ते निसर्गाने दिलेले दान सर्वांसाठीच सारखे असते, त्यामुळे ते सर्वांनी वाटून खावयाचे असेल, तर त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पावसाळ्यात पाणी मुरवायचे आणि उन्हाळ्यात हवे तसे, हवे तेवढे वापरायचे असेल तर रेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरज आहे.

Leave a Comment