एका उर्दु शायराने म्हटले आहे. लोग आते गये कारवॉं बढता गया. राजकारणात कारवॉं बढता है लेकीन तो मतलबी असतो. मतलब संपला की कारवॉं घटता गया अशी अवस्था होते. भाजपाने १९९८ साली १८ पक्षांची आघाडी करून सत्ता मिळवली होती. या सरकारने सहा वर्षे वाटचाल केली पण सहाव्या ठेल्यावर आल्यानंतर आघाडीच्या नेत्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा अनेक मित्रपक्ष मागेच राहिले असून त्यांनी साथ सोडली आहे असे लक्षात आले. शेवटी २००४ साली निवडणूक लढवताना त्यांना अनेक मित्र पक्षांना सोबत न घेताच मैदानात उतरावे लागले. आता संपुआघाडीची अवस्था अगदी तशीच झाली आहे. या आघाडीने आपला नववा वर्धापन दिन साजरा केला. पुन्हा आपणच सत्तेवर येणार अशा खात्रीने ते बरेच सुखावले होते पण गेल्या दोन तीन दिवसात विशेषत: नऊ वर्षांच्या आढाव्यावरच्या प्रतिक्रिया ऐकताना त्यांना वस्तुस्थिती कळायला लागली.यानंतर आपणच सत्तेवर येणार असे बळेच म्हटले तरी ते उसने अवसान होते याची त्यांना जाणीव झाली. तिसर्यांदा सत्ता काबीज करताना समाजात आवश्यक तेवढी विश्वासार्हता आपण निर्माण करू शकलो नाही ही गोष्ट डाचायला लागली.
समाजात तर नाहीच पण आपल्या आघाडीच्या मित्र पक्षांनाही आपण विश्वास देऊ शकलो नाही हे पंतप्रधान मनमोहनसिंग यांना लक्षात आले. नवव्या वाढदिवसाला दिलेल्या मेजवानीतच त्यांना आपले हे अपुरेपण ध्यानात आले. सत्तेवर येताना आपण ज्या मित्रपक्षांच्या साह्याने बहुमत सिद्ध केले होते. त्यातले किती मित्रपक्ष आता आपल्या सोबत आहेत याचा शोध घेण्यासाठी मनमोहनसिंग इकडे तिकडे बघायला लागले तेव्हा त्यांना शरद पवार यांच्याशिवाय एकही लक्षणीय प्रभाव असलेला नेता दिसेना. तेव्हा ते कावरेबावरे झाले. शरद पवार हेही त्यांच्या सोबत आघाडी करून राज्यात सत्तेवर आले आहेत म्हणून आघाडीत टिकले आहेत. बाकीचे कोणीच सोबत नाहीत. द्रमुकचे नेते करुणानिधी त्यांना कोठे दिसेनात. त्यांनी आपले १९ खासदार आघाडीच्या मागे उभे केले होते. आता ते आघाडीपासून दूर गेले आहेत. आपल्या कन्येला अटक झाल्यापासून ते अस्वस्थ आणि पंतप्रधानांवर नाराज आहेत. आता त्यांची समजूत काढून त्यांना आघाडीत आणले तरीही काही साध्य होणार नाही कारण राज्यातही या पक्षाचा प्रभाव ओसरला आहे. विधानसभेत दारुण पराभव झालेला आहे.
करुणानिधी यांच्या कुटुंबात वारसायुद्ध सुरू झाले असल्याने त्यांचा हा पक्ष कधी फुटेल याचा काही नेम दिसत नाही. तामिळनाडूतून फार काही हाती लागेल असे दिसत नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत ३६ खासदारांची मोठी निर्णायक कुमक पाठवणारे आंध्र प्रदेश हे राज्य आता हातातून निसटले आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनी तेलंगणाच्या समस्येचे चांेंभाळे करून टाकल्याने ही स्थिती निर्माण झाली आहेच पण जगन मोहन रेड्डी हे प्रकरण हाताळता न आल्यानेही या राज्यातले स्थान नष्ट झाले आहे. तेलंगणा राष्ट्र समिती हा पक्ष संपुआघाडीचा घटक पक्ष होता. पण आता तो आघाडीच्या बाहेर पडला आहे. याच राज्यातल्या काही भागात मुस्लिम मतदारांवर प्रभाव असलेल्या इत्तेहादुल मुसलमीन या पक्षानेही साथ सोडली आहे. हा काही फार मोठा पक्ष नाही पण आंध्रात मुस्लिम मते मिळवून देण्यास तो उपयोगी पडत होता. आता याही मतांचा आधार गेला आहे. संपुआघाडीला मिळालेला सर्वात मोठा पाठींबा म्हणजे तृणमूल कॉंग्रेसचा. या पक्षाने पाठींबा काढून घेतला आहे. पुढे मागे पुन्हा जमवून घेता येईल असे वाटत होते पण आता कॉंग्रेस आणि तृणमूल कॉंग्रेस या दोन पक्षांत तिथे रस्त्या रस्त्यावर मारामारी सुरू झाली आहे. कॉंग्रेसचा अठरा खासदारांचा आधार गेला आहे. जवळपास कोणाचाही मित्रपक्ष म्हणून आसरा सापडत नाही.
मागे लालू प्रसाद कॉंग्रेसच्या वळचणीला आले होते. कोणाही कॉंग्रेसी नेत्यापेक्षा अधिक प्रमाणात सोनिया गांधी यांची प्रशंसा करीत होते पण त्यांच्या प्रशंसेच्या मागे मोठे विष दडलेले आहे असे नंतर दिसून आले. आता या विषाची परीक्षा घेण्याचा काही प्रश्नच नाही. कारण लालूने मित्र म्हणून गळ्याला मिठी मारली पण नंतर कॉंग्रेसची तिरडी बांधण्याची भाषा सुरू केली. आता ज्या दोन मित्र पक्षांच्या साह्याने सत्ता आणि बहुमत टिकवून ठेवले आहे त्या दोन पक्षांना म्हणजे बसपा आणि सपा यांना मित्र पक्ष म्हणणे ही अतिशयोक्तीच ठरणार आहे कारण ते कॉंग्रेसचे कट्टर शत्रू पक्ष आहेत. आता मागे उभे असले तरी निवडणुका येतील तेव्हा समोरासमोर उभे राहतील. त्यांच्या मैत्रीचा कणभरही फायदा होणार नाही अशी अवस्था आहे. एकट्याच्या जीवावर येत्या निवडणुकीत किती पाणी कापता येईल याबाबत कॉंग्रेसच्या नेत्यांतच संभ्रम पसरला आहे. जोपर्यंत बहुमताचा आत्मविश्वास असेल तोपर्यंत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची तळी उचलतील पण राहुल गांधी यांच्या मर्यादा लक्षात यायला लागल्या आणि त्यांच्या जीवावर सत्ता मिळणार नाही याची जाणीव व्हायला लागली की कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना जुमानेनासे होतील ती प्रक्रिया सुरू झाली आहे.