टोयाटा छोट्या कार भारतीय बाजारात आणण्यास उत्सुक

नगोया दि.२४ – भारतात कार विक्रीत अव्वल स्थान पटकावण्यासाठी जपानी कार उत्पादक कंपनी टोयाटा मोटर कार्पोरेशन भारतीय बाजारात छोट्या कारची आणखी कांही मॉडेल्स आणण्यास उत्सुक असल्याचे कंपनीचे प्रमुख सतोशी ओगीशो यांनी स्पष्ट केले आहे. मात्र छोट्या कार आणतानाच सध्या तेजीत असलेल्या एसयूव्ही क्षेत्राकडेही कंपनी दुर्लक्ष करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वाहन उद्योग संबंधात भारत सरकार त्यांची भूमिका अजून स्पष्ट करत नाही त्यामुळे डिझेल इंजिनाचा नवा प्रकल्प अथवा हायब्रिड कार सादर करण्याबाबत कंपनीने सध्या थांबा आणि पहा असे धोरण स्वीकारले असल्याचे सांगून ओगीशेा म्हणाले की भारतातील आमचा छोट्या कार क्षेत्रातला पोर्ट फोलियो पाहिला तर आमच्याकडे एकमेव लिवा ही छोटी कार आहे. त्यामुळे भारतात विक्रीत अव्वलस्थान पटकावण्यासाठी आम्हाला आणखी कांही छोट्या कारची मॉडेल सादर करणे आवश्यक आहे.

सर्व जगभरात सध्या एसयूव्हीची लोकप्रियता अतिशय वेगाने वाढते आहे आणि भारतही त्याला अपवाद नाही. त्यामुळे या क्षेत्राकडेही कंपनी लक्ष पुरविणार असून या क्षेत्रातही कांही मॉडेल्स देऊन आम्ही पाय रोवण्याचा प्रयत्न करणार आहोत असेही ते म्हणाले.