पुण्यातूनही बेटींग प्रकरणी चार जणांना अटक

पुणे दि.२४ -वडगांव शेरी भागातील एका पॉश सोसायटीतील फ्लॅटवर छापा घालून पुणे पोलिसांनी चार जणांना अटक केली असल्याचे वृत्त आहे. यातील एक जण आयपीएल बेटींग साठी बुकी म्हणून कार्यरत होता असेही समजते. राजस्थान रॉयल्स व हैद्राबाद सन रायझर्स यांच्यात द्ल्ल्लीत झालेल्या सामन्यासाठी येथे बेटींग घेतले गेले होते. या फ्लॅटमधून पोलिसांनी ११ मोबाईल, २ टिव्ही आणि १ लॅपटॉप जप्त केला आहे.

अमली पदार्थ नियंत्रण शाखेचे वरीष्ठ पोलिस अधिकारी सुनील तांबे या विषयी अधिक माहिती देताना म्हणाले की या विभागाला वरील ठिकाणी बेटींग घेतले जात असल्याची खबर मिळाली. त्यानुसार त्या जागेवर पोलिस गेले असता फ्लॅटला बाहेरून कुलुप होते. मात्र कुलुप तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला तेव्हा बुकी अहमद खोजा उर्फ गुड्डू आत असल्याचे पोलिसांना आढळले. त्याला अटक करण्यात आली असून अझीम अझीयानी, हुसेन सांगलीवाला व अल्ताफ लखानी अशी अटक करण्यात आलेल्या अन्य तिघांची नांवे आहेत. हे तिघेही पुण्यातील उद्योजक आहेत.

गुड्डू हा पुण्यासाठी बुकी म्हणून काम करत होता आणि त्याचा मुंबईतील नंदू नावाच्या बुकीशी संफ होता. त्याच्यातर्फे गुड्डू पुण्यात बेटींग घेत होता असे चौकशीत समजले आहे. नंदू हाही मुंबई पोलिसांना हवा असून तो सध्या फरार आहे. मात्र तो पोलिसांच्या हाती लागला तर आणखी महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळण्याची शक्यता असल्याचेही तांबे म्हणाले.

Leave a Comment