आम्ही पंतप्रधानांच्या पाठीशी – सोनिया, राहुल

नवी दिल्ली, दि.२३ – पंतप्रधानांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत अशी ग्वाही सोनिया आणि राहुल गांधी यांनी दिली आहे. मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचा दावा करणारे वृत्त अलीकडेच प्रसिद्ध झाले होते. मात्र, सोनिया आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हे वृत्त फेटाळून लावले.

सोनिया म्हणाल्या, पंतप्रधान आणि माझ्यात कुठलेही मतभेद नाहीत. आमच्याकडे सामूहिक नेतृत्व आहे. विरोधक कितीही टीका करत असले तरी पंतप्रधान प्रभावीपणे त्यांची जबाबदारी सांभाळत आहेत. आम्हाला त्यांच्याविषयी आदरच वाटतो. आम्ही सर्व जण त्यांच्या पाठीशी आहोत. राहुल यांनीही सोनियांचाच सूर आळवला. काँग्रेस अध्यक्षा आणि पंतप्रधानांमध्येही कुठल्याच प्रकारचे मतभेद नाहीत. विरोधकांनी मतभेदांचे चित्र निर्माण केले आहे, असे ते म्हणाले.