मुंबई दि.२४ – भारतातील दोन नंबरची प्रवासी विमान वाहतूक कंपनी जेट एअरवेज आणि आबुधाबीच्या इतिहाद विमान कंपनीत दीर्घ काळ प्रलंबित असलेला सहकार्य करार आता अंतिम टप्प्यात आला असून आज, उद्या वा या आठवडयात कधीही या करारावर संह्या होतील असे खात्रीलायक वृत्त जेटमधील जबाबदार अधिकार्यांनी दिले आहे.
जेट एअरवेज आणि इतिहाद करार अंतिम टप्प्यात
या करारानुसार जेट इतिहादला २४ टक्के स्टेक विकणार आहे. भारत सरकारने परदेशी विमान कंपन्यांना ४९ टक्कयांपर्यंत वाटा देता येईल अशी परवानगी दिल्यानंतर असा करार करणारी जेट ही पहिली भारतीय विमान कंपनी ठरली आहे. या स्टेकच्या विक्रीतून जेटला ३०० दशलक्ष डॉलर्स मिळणार असल्याचेही समजते.
जेट कंपनीच्या कर्जाचा आकडा ३१ डिसेंबर १२ रोजी २.१६ अब्ज डॉलर्सवर गेला होता. जेट इतिहादशी करत असलेल्या स्टेक विक्रीतून मिळणारी रक्कम कर्जफेडीसाठी वापरणार आहे. यापूर्वीही जेटने यूएइ एअरलाईन्सला त्यांचा हिथ्रो विमानतळावरचा स्लॉट ७० दशलक्ष डॉलर्सना विकला आहे. शिवाय या करारामुळे जेटला एतिहादला कर्जपुरवठा करणार्या संस्थेकडून तीन टक्के व्याजाने ३०० दशलक्ष डॉलर्सचे कर्जही उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
