ओबामा उत्तम – व्हाईट हाऊसही सुरक्षित

वॉशिग्टन दि. २४ – असोसिएटेड प्रेसचे ट्विटर अकौंटवरून व्हाईट हाऊसमध्ये दोन बॉम्बस्फोट झाल्याच्या आणि त्यात राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा जखमी झाल्याच्या ब्रेकिंग न्यूजने अमेरिकेत चांगलीच खळबळ माजली. अमेरिकेचा शेअर बाजारही या वृत्ताने गडगडला.  मात्र हे अकौंट हॅक झाले असल्याचे आणि त्यावरून नुकत्याच प्रसारित करण्यात आलेल्या बातम्या खोट्या असल्याचा खुलासा व्हाईट हाऊसमधील असोसिएटेड प्रेसच्या  प्रतिनिधी ज्युली पेस आणि व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जे कार्नी यांनी पत्रकार परिषदेत केल्याने सर्व व्यवहार पुन्हा सुरळीत सुरू झाले.

व्हाईट हाऊस मध्ये नेहमीची पत्रकार वार्ता सुरू होण्याच्या कांही क्षण अगोदर ही बातमी असोसिएटेड प्रेसच्या ट्विटर वरून प्रसारित झाली होती. मात्र प्रवक्त्या कार्नी यांनी आपण आत्ताच राष्ट्राध्यक्षांसोबत होतो आणि ते उत्तम असून कोणताही स्फोट येथे झालेला नाही असा खुलासा पत्रकरांना केला. तोपर्यंत सकाळीच आलेल्या या बातमीने स्टॉक मार्केट एकदम कोलमडले होते. नंतर बातमी खोटी असल्याचा व अकौंट हॅक झाल्याचा खुलासा झाल्यानंतर शेअर मार्केट पूर्वपदावर आले असे समजते.