मुंबई – दुष्काळाची तीव्रता मराठवाड्यात खूपच भीषण आहे. मराठवाडा विभागातील धरणे कोरडेठाक पडली असून तेथे केवळ ७ टक्केच पाणी शिल्लक आहे. त्यासोबतच राज्यातील धरणे आता तळ गाठू लागली आहेत. राज्यातील जलाशयांमध्ये सध्या केवळ २४ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील २४७५ धरणांमध्ये ८८५६ दशलक्ष घनमीटर एवढेच पाणी शिल्लक आहे.
मराठवाडा विभागातील पाणीस्थिती चिंताजनक आहे. मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सध्या १७३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.जायकवाडी, माजलगाव, निम्न तेरणा, सिना-कोळेगाव, पुर्णा सिद्धेश्वर धरणांत तर शून्य टक्के अर्थात पाणीसाठाच नाही, अशी परिस्थिती आहे. जायकवाडी धरणात मागील वर्षी २५८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक होता यावरून यंदाच्या भीषण परिस्थितीची जाणीव होते.
कोकणातील जलाशयातील पाणीस्थिती इतर विभागांच्या तुलनेत बरी आहे. मुंबईसाठीच्या धरणांची स्थिती पाहता नागरिकांवर कृपाच झाली आहे. . एकीकडे मराठवाड्यातील धरणांमध्ये पाणीसाठ्याची भीषण अवस्था असताना काही धरणांच्या बॅकवॉटरमधून पंपाद्वारे पाणी खेचून ते आपल्या शेतातील पिकांना दिले जात आहे.