नवी दिल्ली- दिल्लीत पुन्हा एकदा बलात्काराची घटना घडली आहे . एका शेजा-यानेच पाचवर्षीय मुलीला चार दिवस डांबून ठेवत क्रूर बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे . प्रचंड शारीरिक हाल केल्याने ही लहानगी मृत्यूशी झुंज देत आहे . शरमेची बाब म्हणजे , ही घटना उघडकीस आल्यानंतर तिच्या वडिलांना गप्प बसण्यासाठी पैसे देऊ केल्याचेही समोर आले आहे. या आरोपीचे नाव मनोज असून बिहारचा रहिवासी असल्याचे समजते .
दिल्लीतील गांधी नगर भागातील ही मुलगी खेळण्यासाठी घराबाहेर पडलेली सोमवारनंतर कुणालाच दिसली नाही . तिचा शोध घेण्यासाठी पालकांनाही पोलिसांनी दाद दिली नाही . अखेर बुधवारी तळमजल्यावरील एका घरातच ती अत्यवस्थ अवस्थेत सापडली. वैद्यकीय चाचणीनंतर तिच्यावर अतिशय पाशवी पद्धतीने बलात्कार केल्याचे उघडकीस आले. या आरोपीचे नाव मनोज असून तो मुजफ्फरपूर , बिहारचा रहिवासी आहे . तो गेल्या आठ दिवसांपासून मुलीच्याच इमारतीत भाड्याने राहत होता .
स्वामी दयानंद हॉस्पिटलमध्ये वेदनेने विव्हळणा-या या मुलीवर गुंगीचे औषध देऊन तपासण्या केल्या असता , या पाशवी प्रकाराने डॉक्टरही हादरले . तिच्या शरीरात मेणबत्तीचे तुकडे आणि २०० मिलीची तेलाची बाटली आढळली. ऑपरेशनने त्या काढण्यात आल्या. या मुलीच्या गळ्यावरही व्रण असल्याने तिची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याचीही शक्यता आहे. गंभीर अवस्थेतच तिला पुढील उपचारासाठी एम्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे .