औरंगाबाद – दुष्काळामुळे मराठवाडयात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या या भागात टँकरने पाणी पुरविले जात आहेत. सध्या टँकरची संख्या १८०७ पर्यंत पोहचली आहे. विभागातील लातूर वगळता सर्वच जिल्ह्यांत टँकरग्रस्त गावे आहेत. सध्या सर्वाधिक ५२५ टँकर औरंगाबाद जिल्ह्यात सुरू आहेत.
मराठवाडयात १५३० गावे आणि ७०५ वाड्यांत पाणी टंचाई भासत आहे. त्यासाठी १८०७ टँकर सुरू करण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यातील ३५२ गावे १०२ वाड्यांत ४३६ टँकऱद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. त्याखालोखाल बीड जिल्ह्यात ३९० गावे आणि ५३७ वाड्यांत ४४१ टँकर सुरू आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात १४९ गावे आणि २० वाड्यांत २४७ टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील टँकरची संख्या १२६पर्यंत पोचली आहे. परभणी जिल्ह्यात ११ आणि हिंगोली जिल्ह्यात तीन टँकर सुरू आहेत.
उस्मानाबाद शहरात ६२ आणि जालना शहरात २५ टँकर सुरू आहेत. त्याशिवाय भोकरमध्ये दहा , उमरग्यात नऊ , भोकरदनमध्ये सात, तुळजापुरात दोन आणि लोह्यात एका टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा सुरू आहे. लातूर जिल्ह्यात टँकर सुरू नाहीत , मात्र तेथील १३१ गावे आणि तीन वाड्या टंचाईग्रस्त आहेत. तेथे पाणी पुरविण्यासाठी प्रशासनाने १८५ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. या विहिरींच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनांना पाणी पुरविण्यात येत आहे.