बंगळुरू- येथील मल्लेश्वरम भागातील भाजप कार्यालयाजवळ एका मारुती कारमध्ये शक्तीशाली स्फोट झाला असून त्यात १६ जण जखमी आहेत. यामध्ये १८ गाड्या जळून खाक झाल्या आहेत. हा स्फोट सिलींडरचा आहे की दहशतवाद्यांनी घडवून आणलेला आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. ही घटना बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
रस्त्यावर उभ्या असलेल्या मारुती कारमध्ये अचानक स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की, कार जळून खाक झालीच पण बाजूला असलेल्या तीन कार तसेच १५ बाइक्सही भस्मसात झाल्या. या घटनेत १६ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी चार अग्निशमन बंब दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. स्फोटाचा आवाज तीन किलोमीटरपर्यंत आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा स्फोट पूर्वनियोजित होता व एका व्यक्तीला संशयास्पदरीत्या हालचाल करताना आपण पाहिल्याचा दावा त्यांनी केला. मात्र सुरक्षा यत्रणांनी प्रथमदर्शनी हा सिलींडर स्फोट असल्याचे म्हटले आहे.
या ठिकानाहून जवळच भाजप कार्यालय आहे. त्यामुळे सावधगीरी म्हणून पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. बंगळुरूमध्ये ही घटना घडल्याने सुरक्षा यंत्रणा मात्र हादरल्या आहेत. स्फोटानंतर सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.