विजेंदरसिंगने केले नाही अमली पदार्थांचे सेवन

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसापासून बॉक्सर विजेंदरसिंगचे नाव अमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणाशी जोडले गेले होते. नुकतीच त्याची राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संघटनेच्या ( नाडा ) प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली होती. यामध्ये बॉक्सर विजेंदरसिंगच्या शरीरात हेरॉइनसह बंदी घालण्यात आलेले कोणतेही उत्तेजक नसल्याचे निदान झाले आहे .यामुळे बॉक्सर विजेंदरला दिलासा मिळाला आहे. क्रीडा मंत्रालयाने विजेंदरच्या रक्त व मूत्राच्या नमुन्यात कोणतेही उत्तेजक नसल्याचे जाहीर केले.

क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संघटनेला विजेंदरची चाचणी करण्यास सांगितले होते. त्यांनी आज या चाचणीची माहिती दिली. विजेंदरसह इतर बॉक्सर्स या चाचणीत निर्दोष ठरले आहेत. त्यांनी बंदी घातलेली कोणतीही उत्तेजके वापरली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे क्रीडा आणि युवककल्याण मंत्रालयाला हे जाहीर करताना आनंद झाला आहे.

गेल्या महिन्यात अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रकरण बाहेर आले होते आणि त्यात विजेंदरचे नाव जोडले गेले. विजेंदरने १२ वेळा हेरॉइन घेतल्याचे पोलिसांनी म्हटले होते तर त्याचा सहकारी रामसिंग याने विजेंदरने गंमत म्हणून हेरॉइनची चव चाखल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे विजेंदरच्या रक्त व केसांचे नमुने पोलिसांनी मागितले होते पण विजेंदरने ते देण्यास नकार दिला. ‘नाडा’ ने ३ एप्रिलला विजेंदरच्या रक्त व मूत्राचे नमुने घेतले होते. या नमुन्यात कोणतेही उत्तेजक नसल्याचे क्रीडा मंत्रालयाने जाहीर केले.

Leave a Comment