मुंबई इंडियन्सचा दिल्ली डेअरडेव्हिल्सवर विजय

मुंबई: आयपीएलच्या सहाव्या हंगामात मंगळवारी झालेल्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सचा ४४ धावांनी पराभव केला. त्याआधी दिनेश कार्तिक आणि रोहित शर्मा यांच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध २०९ धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र दिल्लीला डोंगर सर करता आला नाही. त्यांनी २० षटकात नऊ बाद १६५ धावा केल्या.

दिल्लीचा हा स्पर्धेतील सलग तिसरा पराभव आहे. तर मुंबईने तीनपैकी दोन सामन्यात विजय मिळवत गुणतक्त्यात अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार रिकी पाँटिंग आणि सचिन तेंडुलकरने मुंबईच्या डावाची सुरुवात केली. मात्र पाँटिंग शून्यावर तर सचिन केवळ एक धाव काढून बाद झाला. हे सलामीवीर बाद झाले तेव्हा मुंबईची अवस्था दोन बाद एक अशी होती. त्यानंतर दिनेश कर्तिक आणि रोहित शर्मा यांनी तिस-या विकेटसाठी १३२ धावांची भागीदारी केली. कार्तिकने ४८ चेंडूत दोन षटकार आणि १४ चौकारांच्या मदतीने ८६ धावा केल्या; तर शर्माने ५० चेंडूत नाबाद ७४ धावा केल्या. दिल्लीकडून आशिष नेहराने दोन गडी बाद केले.

सामनावीर किताब दिनेश कार्तिकने पटकाविला.