एलपीजी ग्राहक आणि वितरकांमधील गोंधळाला पूर्णविराम

पुणे दि. २५ – आत्ताच्या मार्चमध्ये सिलिंडर नोंदविला असेल पण त्याची डिलिव्हरी एप्रिलमध्ये मिळाली तर हा सिलिंडर पुढच्या वर्षाच्या अनुदानित सिलेंडरच्या कोट्यात धरला जाणार का मागच्या कोट्यात धरला जाणार याविषयी ग्राहक आणि वितरक यांच्यात असलेल्या गैरसमजनांना आता तेल कंपन्यांच्या खुलाशानंतर पूर्णविराम मिळाला आहे.

केंद्र सरकारने गेल्या वर्षी प्रत्येक एलपीजी ग्राहकाला सहा सिलिंडर अनुदादित दरात देणार असल्याची घोषणा केली होती मात्र नंतर ही संख्या ९ सिलिंडर वर नेण्यात आली. त्यामुळे सप्टेंबर १२ ते मार्च १३ या कालावधीत ग्राहकाला पाच सिलेंडर अनुदादित दरात मिळणार होते. मात्र यंदा ३१ मार्चला रविवार आला आहे. त्यामुळे मार्चमध्ये सिलिंडर नेांदविला असला आणि त्याची डिलिव्हरी एप्रिलमध्ये मिळाली तर हा सिलिंडर मागच्या कोट्यात धरणार का नव्या कोट्यात याविषयी उलटसुलट चर्चा सुरू होती. ग्राहक आणि वितरक दोघेही यामुळे संभ्रमात होते.

भारत पेट्रोलियम आणि हिदुस्तान पेट्रोलियम या दोन्ही कंपन्या केंद्राकडून यासंबंधी सूचना येण्याची प्रतीक्षा करत होत्या. त्या अजूनही आलेल्या नाहीत मात्र या कंपन्यांनी मार्चमधला नोंदविलेला सिलिंडर ग्राहकाला ३१ मार्चपर्यंत रविवार असला तरी दिला जाणार आहे आणि त्यामुळे तो मागच्या कोट्यातलाच धरला जाणार आहे. अर्थात ग्राहकांनीही मार्च अखेरपर्यंत गॅस नोंदविण्याची वाट न पाहता वेळेवर नोंदवावा असेही आवाहन कंपन्यांनी केले आहे.