जाड व्यक्तींसाठी विमान तिकीट महाग?

flight

वजन जास्त असल्याचे फायदे कोणते आणि तोटे कोणते याची भलीमोठी यादी आजपर्यंत अनेकांनी सादर केली आहे. केवळ आरोग्याच्या दृष्टीने वजन कमी असणे यापुढे फायद्याचे ठरणार नाही तर तुम्ही वारंवार विमान प्रवास करत असलात तर त्यासाठीही ते फायदेशीर ठरणार आहे. कारण नॉवेमधील विद्यापीठातील  प्रोफेसर भारत पी भट्ट यांनी जास्त वजन असलेल्या व्यक्तींमुळे विमानाला जादा इंधन लागते व परिणामी विमान कंपनीचा खर्च वाढतो असा शोध लावला असून सर्व विमानकंपन्यांनी विमान तिकीटांचे दर ठरविताना व्यक्तीचे वजनही लक्षात घ्यावे असा अर्जच दाखल केला आहे.

या प्राध्यापकांच्या मते वजन आणि आकार यानुसार सेवा कंपन्यांनी दर आकारणी करावी हे सगळ्या जगाने मान्य केलेले आहे. त्यात केवळ वाहतूक सेवाच नसून अन्य सेवाही आहेत. विमान वाहतूक हे मोठे सेवा क्षेत्र आहे आणि आज जगातील बहुसंख्य विमान कंपन्या तोट्यात अथवा अगदी मामुली नफ्यावर चालविल्या जात आहेत ही बाबही महत्त्वाची आहे. प्रोफेसरांनी असे सिद्ध केले आहे की जादा वजनाचा प्रवासी विमानात असेल तर  अन्य कमी वजनाच्या प्रवाशाच्या तुलनेत विमानाला इंधन जादा लागते. परिणामी अधिक कार्बन डाय ऑक्साईड हवेत सोडला जातो व विमानकंपन्यांचा खर्च वाढतो.

यापुढे विमान कंपन्यानी एक मिनिमम वजन गृहित धरून त्यानुसार जादा वजन असणाऱ्याना जादा तिकीटदर तर कमी वजन असणाऱ्याना कमी तिकीटदर अशी रचना करावी असा अर्ज या महाशयांनी दाखल केला आहे. म्हणजे ६० किलो वजनाच्या माणसापेक्षा १२० किलो वजनाच्या माणसासाठी दुप्पट दर आकारावा असे त्यांनी सुचविले आहे.

त्यांचीही आयडिया कितीही चांगली असली तरी विमान कंपन्यांनी मात्र त्यात फारसा रस दाखविलेला नाही. कारण ते व्यवहार्य नाही . विमान कंपन्यांच्या मते प्रवासी लगेजसाठी अगोदरच जादा खर्च करत असतोच त्यामुळे त्याच्यावर हा अधिकचा बोजा टाकणे शक्य होणार नाही. अन्यथा आहे ती प्रवासी संख्याही आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment