
उषा जाधव ( सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, धग) – राष्ट्रीय पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे. लहानपणापासून बघितलेले स्वप्न माझे पुर्ण झाले आहे. आनंद व्यक्त करण्यासाठी मला शब्द अपुरे पडत आहेत. जणू नवे पर्व, नवे आयुष्य सुरु झाले आहे. धग हा माझा पहिलाच चित्रपट करिअरमधला माईलस्टोन ठरला आहे. आयुष्यात जे हवे होते, ते धगच्या निमित्ताने मिळाले आहे.
विक्रम गोखले ( सर्वोत्कृष्ट अभिनेता, अनुमती) – हा पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. या सिनेमासाठी आम्ही जे कष्ट घेतले होते त्याचे आज सार्थक झाले. सिनेमाचे दिग्दर्शक, लेखक यांच्यासह मी सर्वांना या पुरस्काराचे श्र्र्ेय देतो,
शिवाजी लोटन पाटील ( सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक , धग )- रस्त्याने जात असताना अचानक मला फोन आला आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचे समजले. हे कळल्यानंतर दोन मिनिट मी स्तब्धच झालो. मला माझ्या कानांवर विश्वासच बसला नाही. हा आनंद व्यक्तच करता येत नाहीये. राष्ट्रीय पुरस्कारांसाठी सिनेमा पाठवला तेव्हा पुरस्कार मिळेल असे वाटले नव्हते. अनेक जाणकार दिग्दर्शक या यादीत होते. त्यांच्यातून माझी निवड होणे, हे माझ्यासाठी स्वप्नवतच आहे.
शैलेंद्र बर्वे,( सर्वोत्कृष्ट संगीतकार, संहिता) – एकांकिका असो, मालिका असो, किंवा सिनेमा असो, प्रत्येक गोष्ट मी पॅशनने करत आलोय. बातमी कळल्यानंतर विश्वासच बसत नव्हता. संहितामध्ये लिलया पद्धतीचं संगीत केलं आहे. मार कमी वाद्यांचा वापर आम्ही या सिनेमातील संगीतासाठी केलाय. 1947 सालाचं संगीत या सिनेमासाठी उभं करायचं होतं. संगीतासाठी घेतलेली मेहनत आज मळाला आली आहे.
