धवन, क्लार्क दिल्ली कसोटीला मुकण्याची शक्यता

मोहाली- आपल्या पदार्पणाच्या कसोटीतच विक्रमी जलद शतक करणारा शिखर धवन आणि पाठदुखीमुळे त्रस्त असलेला कांगारूचा कर्णधार मायकेल क्लार्क शेवटच्या दिल्ली येथील कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी कदाचीत शेन वॉटसन कर्णधारपदाची धुरा वाहण्याची शक्यता आहे.

मोहाली येथील कसोटी सामन्यात शिखर धवनला क्षेत्ररक्षणादरम्यान हाताला झालेल्या दुखापतीमुळे त्याला पुढील कसोटीवर पाणी सोडावे लागेल,असे दिसते. याबबत काही जणांनी कर्णधार ढोणीकडे विचारणा केली असता तो बहुदा खेळणार नाही असे त्यांनी सांगितले. धवनच्या बाबतीत लवकरच अधिकृत घोषणा होईल. त्यामुळे सध्या तरी त्याच्या खेळन्याविषयी संभ्रम आहे.

तर दुसरीकडे पाठदुखीमुळे मायकेल क्लार्क चौथ्या कसोटीत खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे दिल्ली कसोटीत शेन वॉटसन ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना क्लार्क म्हणाला , ‘ आगामी काळात जर माझा फिटनेसचा प्रश्न निर्माण झाला, तर कदाचीत वॉटसन कर्णधारपदाची सूत्रे हाती घेईल. अद्याप याबबत माझे निवड समितीशी बोलणे न झाल्याने मी निश्चित काही आताच सांगू शकणार नाही.’