अहमदाबाद- गुजरातने गेल्या काही दिवसापासून सौरउर्जा निर्मितीत मोठी आघाडी घेतली आहे. त्यांनी देशातील इतर राज्यांना मागे टाकले आहे. चीनमध्ये २०० मेगावॉट वीज निर्मितीचा सर्वात मोठा प्रकल्प आहे. गुजरातमधील वाळवंटाचा भाग असलेल्या कच्छच्या छोट्या रणामध्ये दररोज सौरउर्जेच्या माध्यमातून २१४ मेगावॉट वीजनिर्मिती करीत चीनच्या प्रकल्पलाही गुजरातने मागे टाकले आहे. केंद्र सरकारने जाहीर करण्यापूर्वीच सौरउर्जेविषयीच्या धोरणाची अंमलबजावणी केल्याचा दावा गुजरात सरकारने केला आहे.
तसे पहिले तर पाण्याचे दुर्भीक्ष असलेला भाग अशी गुजरातमधील कच्छच्या वाळवंटाची ओळख सर्व देशभरात आहे. मात्र या ठिकाणी आता सौरउर्जेच्या माध्यमातून २१४ मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे.
पाटणजवळील चरंका असे या गावाचे नाव असून, या गावाच्या दोन हजार ९६५ एकर परिसरात सौर उर्जेसाठी पॅनेल बसविण्यात आले आहेत.
देशभरातील सरकारी आणि खासगी अशा १७ कंपन्यांनी या परिसरामध्ये तब्बल नऊ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अशा स्वरूपाचा प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात आल्याने या परिसरातील जमिनींचे भावही मोठ्या प्रमाणात वाढले असून एकरी सहा लाखांपर्यंत भाव पोचले असल्याचे समजते.