नाशिक- विधानसभेचे विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला. त्यानंतर नाशिक मधील भाजप-मनसे आघाडीचे काय होणार याची उत्सुकता सर्वाना लागली होती. या वादावर उत्तर देण्याचे टाळून उपमहापौर सतीश कुलकर्णी आणि गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी ‘मनसे’प्रेम दाखवून दिले आहे. त्यामुळे या वादाचा काहीच परिणाम नाशिकमध्ये होणार नसून भाजप-मनसे ‘साथ साथच’ राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन दिवसापूर्वीच विधानसभेत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे हे मनसेच्या आमदारांना बोलू देत नाहीत; त्यांना ‘सेटलमेंट’मध्येच अधिक रस आहे, असे घणाघाती आरोप राज ठाकरे यांनी खडसे यांच्यावर केले. नाशिक महापालिकेत मनसे आणि भाजपची सत्ता असल्याने ठाकरे यांच्या आरोपांना अधिक महत्त्व प्राप्त झाले होते.
यासाठी तातडीने भाजपने पत्रकार परिषद बोलवल्याने पाठींबा मागे घेणार की काय अशी चर्चा होती. उपमहापौर सतीश कुलकर्णी व गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र त्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे टाळत केवळ खडसे यांच्यावरील आरोपाबाबत दु:ख व्यक्त केले. बाकीच्या सर्वच प्रश्नांवर केवळ ‘नो कमेंट’ इतकेच उत्तर त्यांनी दिले. त्यामुळे केवळ वरिष्ठांचा आदेश आला म्हणून पत्रकार परिषदेची औपचारिकता पाळण्यात आल्याची चर्चा मनपा वर्तुळात रंगली होती.
पत्रकार परिषदेत उपमहापौर सतीश कुलकर्णी व गटनेते संभाजी मोरुस्कर म्हणाले, भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्याविषयी राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना दु:ख झालेले आहे. मनसेने नाशिकमध्ये अनेक विषयांमध्ये भाजपच्या भूमिकेविरोधात निर्णय घेतले. मात्र तरीही भाजपने युतीचा धर्म पाळला. तसेच महापालिका शाळेतील गणवेश खरेदी निविदा पद्धतीने व्हावी, अशी भाजपची भूमिका होती. राज ठाकरे यांनी गेल्या वर्षाच्या कालावधीत महापालिकेमध्ये झालेल्या कामकाजाचे अवलोकन करून जनतेला अपेक्षित विकास करण्याची सूचना केल्यास अधिक चांगले होईल.’
दरम्यान, वरिष्ठांमध्ये सुरू असलेल्या वादावर मी भाष्य करणे योग्य होणार नाही. मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे असे सांगून महापौर यतीन वाघ यांनी सविस्तर प्रतिक्रिया देणे टाळले.