विजेंद्रसिंगवर कायदेशीर कारवाई नाही ?

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसापासून अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी संशयाच्या भोव-यात अडकलेला स्टार बॉक्सर विजेंद्रसिंगवर आता काय कारवाई होणार याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. चौकशीत जर विजेंद्रसिंग अमली पदार्थ सेवन करीत असल्याचे निष्पन्न झाले तरीही त्याच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई होऊ शकत नसल्याची माहिती समोर आली आहे.

जर एखाद्या व्यक्तीने विशिष्ट प्रमाणात ड्रग्ज बाळगले असेल किंवा तो तस्करीमध्ये सहभागी असेल तरच त्याला शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात आहे. त्यामुळे जरी विजेंद्रसिंग अमली पदार्थ सेवन करीत असल्याचे निष्पन्न झाले तरी पण त्याच्यावर कुठलीच कारवाई होणार नाही. काही दिवसांपूर्वी पोलिसानी पंजाबमध्ये अनुपसिंह काहलोनच्या घरातून २६ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले होते. या अमली पदार्थांमधला काही भाग आपण विजेंद्रसिंग आणि रामसिंगला पुरवत होतो, असा दावा त्याने केला होता. त्यातच, विजेंद्रसिंगसह अमली पदार्थ घेतल्याची कबुली रामसिंगने दिली, त्यानंतर हे प्रकरण अधिकच गंभीर झाले होते.

त्यानंतर रविवारी नॅशनल स्पोर्टस् इन्स्टिट्युटने या प्रकरणी तातडीने कारवाई करीत रामसिंगची हकालपट्टी केली. त्यामुळे आता विजेंद्रसिंगच काय होणार, तोही गोत्यात येणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असताना त्याच्या चाहत्यांना या नवीन माहितीमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.