‘चारा द्या… पाणी द्या…’ च्या घोषणांनी विधीमंडळ दुमदुमले

मुंबई- ‘चारा द्या… पाणी द्या…’च्या विरोधकांच्या जोरदार नारेबाजीने राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास चारा आणि रिकामे हंडे घेऊन शिवसेना- भाजपच्या मोर्चाने विधानभवन परिसर दणाणून गेला होता. त्यामुळे या अधिवेशनात दुष्काळाचाच मुद्दा प्रामुख्याने गाजणार असल्याची चुणूक पहिल्याच दिवशी या आलेल्या मोर्चामुळे दिसत आहे.

पहिल्याच दिवशी विरोधकानी गोंधळ घालत सरकारची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे एक ना अनेक विषयांवरून हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपने सत्ताधार्यांच्या नावाने सोमवारी आंदोलन केले. चारा आणि करपलेली पिके हातात घेऊन विरोधकांनी विधिमंडळाच्या परिसरात आंदोलन केले.

दुसरीकडे मात्र या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमदार सहभागी झाले नाहीत . राज्यपाल के. शंकरनारायणन् यांची गाडी रोकून मनसेच्या पदाधिकार्यांकडून त्यांना निवेदन दिले. दुष्काळ हाताळण्यात सरकार कुचकामी ठरले असल्याची टीका विरोधक करतायत. दुष्काळाला सिंचन घोटाळाच कारणीभूत असल्याचा आरोप केला जात असताना या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी नेमलेल्या डॉ. माधव चितळे यांच्या विशेष तपास समितीला (एसआयटी) अधिकारच नसल्याचाही आरोप केला जात आहे.

मंत्र्यांचे भ्रष्टाचार आणि १८ मंत्र्यांवर कोर्टांनी ओढलेले ताशेरे, मुंबई आणि उपनगरांमधली रखडलेली विकासकामे, सहकार घटनादुरुस्ती असा बराच दारुगोळा विरोधकांच्या पोतडीत आहे. मात्र विरोधकांमध्येच एकी नसल्याचेही चित्र मनसेने वेगळी चूल मांडत असल्याने दिसून येत आहे.

Leave a Comment