मराठी रंगभूमी आणि टिव्ही मालिकांमधून ‘लव्हर बॉय’ अशी प्रतिमा निर्माण केलेला अभिनेता म्हणजे उमेश कामत! नाटक, मालिकांबरोबरच उमेशने काही चित्रपटही केले. परंतु मुख्य नायकाच्या भूमिकेत तो फार कमी वेळा बघायला मिळाला. आगामी परीस या चित्रपटातून उमेश मुख्य नायकाच्या भूमिकेत दिसणार असून त्यामध्ये तो एका शिक्षण अधिका-याची भूमिका वठविणार आहे. गरीब परिस्थितीमुळे शिक्षणात येणारे अडथळे आणि त्यावर मात करत शिक्षण पूर्ण करुन शिक्षण अधिकारी बनलेल्या रामचंद्र धायगुडेची कथा या चित्रपटात बघायला मिळणार आहे.
शिक्षणाधिका-याच्या भूमिकेत उमेश कामत
लहान वयातच आपल्या आई वडिलांना गमावून बसलेला रामचंद्र आपल्या आजीसोबत राहतो. उदरनिर्वाहासाठी त्याला मामाच्या चहाच्या टपरीवर काम करावे लागते. अभ्यासात हुशार असलेल्या रामला शिक्षणाची आवड आहे, पण चहाच्या टपरीवरील कामामुळे त्याला शाळेसाठी आणि घरकामामुळे अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. अशातच एकेदिवशी रामच्या टपरीवर योगायोगाने एक मोठे अधिकारी येतात आणि राममधील गुणवत्ता बघून ते त्याचं कौतुक करत त्याला बक्षिस म्हणून पेन देतात.
इथून रामच्या आयुष्याला कलाटणी मिळते आणि तो मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करतो. यशस्वी झाल्यानंतरही त्याचा संघर्ष संपत नाही कारण इमाने- इतबारे काम करणा-या रामला नोकरीत अनेक अडचणी येतात. भ्रष्ट लोकांचा सामना करावा लागतो.
सीमा शरद कुमार यांच्या सिल्व्हर स्क्रिन एन्टरटेन्मेण्ट निर्मित आणि शरद कुमार प्रस्तुत परीस या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश साळगांवकर यांनी केले आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि छायालेखनाची बाजू सांभाळली आहे सुनील खरे यांनी. चित्रपटात उमेश कामत सोबत निशा परुळेकर, विजय चव्हाण, अजय पाध्ये, विवेक चाबुकस्वार आदी कलाकार बघायला मिळणार आहेत.
