नागपूर आणि नॉयडामध्ये दोघींवर बलात्कार

नागपूर: शाळेच्या आवारात एका नराधमाने १२ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला. आरोपीची या विद्यार्थिनीशी ओळख नसून तो निर्घृण कृत्य करून पसार झाला आहे.

पीडीत विद्यार्थिनी सकाळी लवकर शाळेत येत असताना अज्ञात इसमाने तिला शाळेच्या आवारातच अडविले आणि तिच्यावर अत्याचार केले. या विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय चाचणीत स्पष्ट झाले असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यापूर्वी दि. १४ जानेवारी रोजी गोव्यातील वास्को येथे अशाच प्रकारे शाळेच्या प्रसाधनगृहात विद्यार्थिनीवर बलात्कार झाला. या प्रकरणातील आरोपीही अद्याप फरार आहेत.

दुसर्‍या एका अमानुष घटनेत राजधानी दिल्लीजवळ असलेल्या नॉयडा भागातही चौघांनी १६ वर्षाच्या एका मुलीवर सामुहिक बलात्कार केला. ही मुलगी दोन दिवसापसून बेपत्ता होती. तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार देताना त्याच परिसरात रहाणार्‍या कल्लू याने तिचे अपहरण केले असल्याची शंका व्यक्त केली होती.

त्यानुसार पोलिसांनी कल्लू याचा माग काढला असता तो महामार्गावर एका कारमध्ये असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला आणि त्याच्या जयप्रकाश या मित्राला ताब्यात घेतले. इतर दोघे पळून गेले. पीडीत मुलगीही त्यांच्याबरोबर सापडली.

Leave a Comment