
नवी दिल्ली: भारतातील नामांकित चॉकलेट उत्पादक कंपनी कॅडबरी इंडिया लिमिटेडला २५२ कोटी रुपयांचा कर चुकविल्या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

नवी दिल्ली: भारतातील नामांकित चॉकलेट उत्पादक कंपनी कॅडबरी इंडिया लिमिटेडला २५२ कोटी रुपयांचा कर चुकविल्या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
ही नोटीस केंद्रीय विक्रीकर विभागाच्या गुप्तचर मुख्यसंचालकांच्याद्वारे पाठविण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले की संबंधित कंपनीने तिच्या हिमाचल प्रदेश मधील बड्डी येथील नवीन युनिट करिता चुकीच्या पद्धतीने करसवलतीचा दावा केला होता. त्यावरुन विक्रीकर विभागाने तपास केला आणि कंपनीचा करचुकवेपणा समोर आणला.
दरम्यान कंपनी सदर कारणे दाखवा नोटीसचा अभ्यास करीत असून यावर त्यांच्या कायेदशीर सल्लागाराशी विनिमय करून उत्तर देण्यात येईल; असे कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. ते म्हणतात की; आम्ही सदर विभागाला चौकशीसाठी पूर्णपणे सहकार्य करु. सध्या ही चौकशी प्रक्रिया सुरु असून याविषयी जास्त बोलणे योग्य ठरणार नाही असे त्यांनी सांगितले.
दरम्यान केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे; हिमाचल प्रदेशातील नवीन औद्योगिक युनिटकरिता सूट दहा वर्षाकरिता विशिष्ट मालाकरिता विक्रीकरावर पूर्णपणे सवलत देण्यात आली आहे. मात्र कॅडबरीच्या युनिटचा करसवलतीचा दावा योग्य कालावधी नसल्याने अग्राह्य असल्याचेही संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.