हैदराबाद: चेतेश्वर पुजाराने दमदार फलंदाजी करताना कसोटी कारकिर्दीतील दुसरे द्विशतक झळकाविले. ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर मिडविकेटमधून अप्रतिम चौकार ठोकून पुजाराने द्विशतक पूर्ण केले. पुजाराने ३० चौकार आणि एक षटकार ठोकून द्विशतक पूर्ण केले. दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा भारताने चार गडी बाद ४३३ धावा केल्या होत्या. टीम इंडियाने कांगारूवर १९६ धावांची निर्णायक आघाडी घेतली आहे.
तिस-या दिवशी एक गडी बाद ३११ धावसंख्येवरून भारतीय फलंदाजंनी खेळ सुरू केला. तब्बल ३७० धावांच्या भागीदारीनंतर ऑस्ट्रेलियाला दुसरी विकेट मिळाली. मुरली विजय द्विशतकाला मुकला असून ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर तो १६७ धावांवर बाद झाला. चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय जोडीने ३७० धावांची विक्रमी भागीदारी केली. त्यानंतर चौकार ठोकून पुजाराने द्विशतक पूर्ण केले. परंतु जेम्स पॅटिंसनच्या चेंडूवर हुकचा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. फाईन लेग सीमारेषेजवळ डोहर्तीने चांगला झेल घेतला.
उपहारानंतर जेम्स पॅटिंसनने सचिन तेंडुलकरला सात धावांवर बाद केले. लेगसाईडला यष्टीरक्षकाने झेल घेतला. परंतु चेंडू बॅटला लागून गेला की नाही, हे स्पष्ट होत नव्हते. तिस-या पंचाने अखेर सचिनला बाद ठरविले. दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा भारताने चार गडी बाद ४३३धावा केल्या होत्या. टीम इंडियाने कांगारूवर १९६ धावांची निर्णायक आघाडी घेत या सामन्यावर पकड मिळवली आहे. धोनी आणि कोहलीची जोडी खेळत होती. अजून दोन दिवसाचा खेळ शिल्लक असून कांगारुंना कसोटी वाचविण्यसाठी दोन दिवस खेळून काढावे लागणार आहेत.