नवी दिल्ली: हैदराबाद बॉम्बस्फोटाचा तपास युद्ध पातळीवर सुरु असून यातून दहशतवाद्यांची अनेक कट करस्थाने उघड होत आहेत. या स्फोटातील प्रमुख संशयित इंडियन मुजाहिदीनचा यासिन भटकळ याने २०११ मध्ये विदेशी पर्यटकांना घेऊन जाणार्या रेल्वेत स्फोट घडवून आणण्याचा कट रचला होता; अशी खळबळजनक माहिती हैदराबाद बॉम्बस्फोटप्रकरणी अटक केलेल्या इंडियन मुजाहिदीनचा अतिरेकी दानिश अन्सारी याच्याकडून मिळाली आहे. दानिशचा जबाब फौजदारी कायद्याच्या कलम १६४ अंतर्गत नोंदविण्यात आला आहे.
याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने अन्सारीला बिहार येथील दरभंगामधून अटक केली होती. अन्सारी हा दिल्ली पोलींसांच्या नोंदीनुसार भटकळचा साथीदार आहे. त्यामुळे त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने वरील कटाची माहिती उघड केली. त्याने पोलिसांना सांगितले की, विदेशी पर्यटकांनी भरलेल्या रेल्वेत बॉम्ब लावण्याची त्याने पूर्ण तयारी केली होती अणि तो बॉम्ब अन्सारीला लावण्यास सांगितला होता, मात्र अन्सारीने त्यास नकार दिला आणि तो दरभंगाला आला. दरम्यानच्या काळात भटकळने अन्सारीला वकस या अतिरेक्याशी भेटवले आणि त्याने अन्सारीला सेलफोन, घड्याळ आणि रिमोटकंट्रोलपासून इलेक्ट्रॉनिक सर्किट बनविण्यास शिकविले; असेही अन्सारीने सांगितले.
ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर भटकळ घाबरला होता. तो इंडियन मुजाहिदीनपासून वेगळे होण्याच्या विचारात होता. असेही अन्सारीने सांगितले. हैदराबाद बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांना पूर्वीपासूनच भटकळवर संशय होता आणि त्यांचा संशय पक्का झाला आहे.